फाल्गुनी पाठकच्या गरब्यासाठी दिलेल्या पैशांचा अपहार ;चारही आरोपींना अटक

अटकेनंतर या चौघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे
फाल्गुनी पाठकच्या गरब्यासाठी दिलेल्या पैशांचा अपहार ;चारही आरोपींना अटक
Published on

मुंबई : फाल्गुनी पाठक दांडियाचे पास देतो असे सांगून फसवणुक करणार्‍या चारजणांच्या एका टोळीला एमएचबी पोलिसांनी अटक केली. आश्‍विन रमाकांत सुर्वे, श्रीपाल मुकेश बागडिया, सुशील राजाराम तिरलोटकर आणि संतोष भगवान गुंबरे अशी या चौघांची नावे आहेत. अटकेनंतर या चौघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

नवरात्रोत्सवानिमित्त बोरिवलीतील चिकूवाडी परिसरात फाल्गुणी पाठक हिच्या दांडियाचे गरब्याचे आयोजन केले असून त्यासाठी पासेसची किंमत ४५ हजार इतकी आहे. कांदिवलीतील ठाकूर व्हिलेजमध्ये राहणाऱ्या निहार श्रेयस मोदीने या दांडियाचा अधिकृत आयोजक विशाल शहा याच्याकडून १५६ पासेससाठी ५ लाख १४ हजार मोजले होते. जश छेडा नावाच्या व्यक्तीने त्यांचा माणूस पासेस घेऊन येत आहे, त्याला पैसे द्या आणि तो सांगेल तेथून तुमचे पासेस कलेक्ट करा असे त्याला सांगण्यात आले. ठरल्याप्रमाणे निहारने एका तरुणाला रक्कम दिली आणि पासेससाठी योगी ग्रीन इमारतीजवळ पाठविण्यात आले. तिथे गेल्यानंतर अशा नावाची कुठलीही इमारत नव्हती. त्यामुळे त्यांनी जश छेडाला फोन केला. मात्र त्याचा फोन बंद येत होता. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी एमएचबी पोलिसांत तक्रार केली होती.

याप्रकरणी आरोपींचा शोध सुरू असतानाच, बुधवारी आश्‍विनी सुर्वे, श्रीपाल बागडिया आणि गुरुवारी सुशील आणि संतोष अशा चौघांना पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्यांनीच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. या आरोपींकडून पोलिसांनी ९१ हजाराची रोख, साडेनऊ लाखांची एक इनोव्हा कार, एक आयफोन असा १० लाख ६१ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in