फ्लॅटसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार

दोघांनी बोगस दस्तावेज बनवून त्यांच्यासोबत फ्लॅटचा खरेदी-विक्रीचा व्यवहार केला होता
फ्लॅटसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार

मुंबई :फ्लॅटसाठी घेतलेल्या अकरा लाखांचा अपहार करुन एका महिलेची फसवणुक केल्याप्रकरणी एका वॉण्टेड आरोपीस दहिसर पोलिसांनी अटक केली. संदीप अरविंद भाटे असे या आरोपीचे नाव असून त्याचा दुसरा सहकारी दिलीप मुरुडकर या गुन्ह्यांत सहआरोपी आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत. बोरिवली येथे राहणारी तक्रारदार महिला ही संदीपच्या परिचित आहे. तो इस्टेट एजंटचे काम करत असल्याने तिने त्याला स्वस्तात फ्लॅटविषयी विचारणा केली होती. यावेळी त्याने तिला फ्लॅट मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. काही दिवसांनी त्याने तिची संदीपशी ओळख करुन देताना त्याची मनपामध्ये चांगली ओळख आहे. त्याच्या मदतीने त्याने तिला फ्लॅट देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानंतर त्यांनी तिला बोरिवली आणि कांदिवलीतील दोन फ्लॅट दाखविले होते. याच फ्लॅटसाठी त्यांनी तिच्याकडून अकरा लाख रुपये घेतले होते. फ्लॅटवर कर्ज देण्याचे आमिष दाखवून त्यांनी तिच्याकडून काही कागदपत्रे घेतले होते. मात्र वारंवार विचारणा करुनही त्याने तिला कर्जासह फ्लॅटचा ताबा दिला नाही. कोरोनामुळे मनपा अधिकारी व्यस्त असल्याची बतावणी करुन ते दोघेही त्यांना टाळत होते. त्यानंतर त्यांनी तिला कांदिवलीतील दुसरा फ्लॅट देण्याचे आश्‍वासन दिले. या फ्लॅटचा मालक सूर्यकांत भिमा डोळस असल्याचे सांगून त्याच्यासोबत त्यांनी तिचे सेल ऑफ अग्रीमेंट केले होते. काही दिवसांनी ही महिला तिच्या पतीसोबत संबंधित सोसायटीमध्ये गेली होती. तिथे गेल्यानंतर तिला या इमारतीमध्ये सूर्यकांत डोळस नावाचा कोणीही रहिवाशी राहत नाही. त्याच्या मालकीचा फ्लॅट नसल्याचे समजले. या दोघांनी सूर्यकांतच्या नावाने बोगस दस्तावेज बनवून त्यांच्यासोबत फ्लॅटचा खरेदी-विक्रीचा व्यवहार केला होता. बोरिवली आणि कांदिवलीतील फ्लॅटसाठी या दोघांनी तिच्याकडून घेतलेल्या अकरा लाखांचा परस्पर अपहार करुन फसवणुक केली होती. हा प्रकार निदर्शनास येताच तिने संदीप भाटे आणि दिलीप मुरुडकर या दोघांविरुद्ध दहिसर पोलिसात तक्रार केली होती. ३० जुलै २०२३ रोजी गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या संदीप भाटे याला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने या महिलेची फसवणुक केल्याची कबुली दिली. याकामी त्याला दिलीप मुरुडकर याने मदत केली होती. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहे का याचा आता पोलीस तपास करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in