उद्धव ठाकरेंकडून जनतेची दिशाभूल; दीपक केसरकर यांचा आरोप

पक्षातील एखाद्या प्रमुख व्यक्तीला पक्षातून काढण्याचा निर्णय फक्त पक्षप्रमुख घेऊ शकत नाही, तर तो संपूर्ण पक्षाचा निर्णय असावा लागतो.
उद्धव ठाकरेंकडून जनतेची दिशाभूल; दीपक केसरकर यांचा आरोप

प्रतिनिधी/मुंबई : शिवसेनेची १९९९ ची घटना अधिकृत असून २०१३ मध्ये करण्यात आलेली घटनादुरुस्ती पूर्णपणे अवैध आणि १०० टक्के लोकशाही विरोधी पद्धतीने करण्यात आल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने आणि विधानसभा अध्यक्षांनी दिला आहे. त्यामुळे आम्हीच बरोबर असून हा निर्णय कसा चुकीचा आहे, अशी ओरड करून जनतेची दिशाभूल करण्याचे आणि त्यांच्या मनात आमच्याबद्दल चुकीची भावना पसरवण्याचे काम उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाचे लोक करत आहेत, असा आरोप मंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी केला.

आमदार अपात्रतेच्या संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाची चिरफाड उद्धव ठाकरे यांनी केली. तत्पूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केसरकर यांनी ठाकरे गटावर टीका केली. “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९९९ मध्ये शिवसेनेच्या पक्षघटनेत लोकशाहीला अभिप्रेत असा बदल केला. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी २०१३ मध्ये घटनेत पुन्हा बदल केला आणि २०१७ साली त्यांनी घटनेत बदल केल्याचे जाहीर केले. पण घटनेमध्ये बदल करताना घटनादुरुस्ती प्रक्रियेनुसार निवडणूक आयोगाची मंजुरी घ्यावी लागते आणि राष्ट्रीय कार्यकारिणीकडे जावे लागते. तसेच आपल्या पक्षाची बैठक घेऊन त्यामध्ये घटनेत बदल केल्याचा प्रस्ताव पारित करावा लागतो. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडून घटना दुरुस्तीची मंजुरी घेतली नव्हती,” असा दावा केसरकर यांनी केला.

पक्षातील एखाद्या प्रमुख व्यक्तीला पक्षातून काढण्याचा निर्णय फक्त पक्षप्रमुख घेऊ शकत नाही, तर तो संपूर्ण पक्षाचा निर्णय असावा लागतो. पक्षाची बैठक घेऊन तो बहुमताने निर्णय घ्यावा लागतो आणि हीच लोकशाही आहे. पण उद्धव ठाकरेंनी तसे काहीही केलेले नाही. त्यांनी कोणतीही लोकशाहीची मूल्ये पाळली नाहीत आणि आज निवडणूक आयोगाने आणि विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय किती चुकीचा आहे त्याची ओरड करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

काँग्रेससोबत सत्ता स्थापन करणे कितपत योग्य?

आपण महायुती म्हणून निवडणूक लढलो. महायुती म्हणून जनतेने आपल्याला निवडून दिले आणि आज स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षघटनेच्या ध्येय-धोरणांना पायदळी तुडवून काँग्रेससोबत जाऊन सत्ता स्थापन करणे कितपत योग्य आहे, याचे उत्तर उद्धव ठाकरे यांनी द्यावे. स्वतः वाईट वागायचे, लोकप्रतिनिधींना कधी भेटायचे नाही. त्यांचा वारंवार अपमान करायचा आणि मग ते पक्ष सोडून गेल्यानंतर त्यांच्यावर पैसे खाण्यासाठी पक्ष सोडला म्हणून घाणेरडे आरोप करायचे, हा अधिकार उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांना कुणी दिला? असा सवाल दीपक केसरकर यांनी उपस्थित केला.

logo
marathi.freepressjournal.in