मुंबई : विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी झाली या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. त्यानंतर राहुल गांधी यांच्या आरोपांचे खंडन करत राहुल गांधी यांच्या डोक्यातील चीप चोरीला गेली, अशी सडकून टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर केली. फडणवीस यांच्यावर निशाणा साधत भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या मतदारसंघातील साडेतीन लाख नावे वगळण्यात आल्याचा गडकरी यांचा व्हिडीओ शेअर करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता गडकरींना जाब विचारणार का, असा सवाल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी फडणवीस यांना विचारला आहे. वडेट्टीवार यांनी याबाबत ‘एक्स’वर पोस्ट केले आहे.
काँग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी कशी झाली, याबाबतचे पुरावे सादर करत सर्व आरोप केले आहेत. पण राहुल गांधी यांच्या डोक्यातील चीप चोरीला गेली आहे, त्यांची हार्ड डिस्क खराब झाली आहे, अशी बोचरी टीका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मात्र फडणवीस यांच्या आरोपाला वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजपा नेते तथा केंद्रीय मंत्री असलेल्या नितीन गडकरींचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये गडकरी हे त्यांच्या मतदारसंघातील साडेतीन लाख नावे गाळण्यात आल्याचा आरोप करत आहेत. तोच व्हिडीओ विजय वडेट्टीवार यांनी शेअर केला आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ‘एक्स’या सोशल मीडिया साइटवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा हा व्हिडीओ पोस्ट करत लिहिले आहे की, “आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांची कोणती चीप आणि डिस्क खराब झाली आहे? निवडणूक आयोगाची वकिली करणारे मुख्यमंत्री, भाजप नेते गडकरींना जाब विचारणार का? मतचोरी होते, मतदार यादीत घोळ केले जातात, याचा पुरावा आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे.
गडकरी यांनी गंभीर आरोप केला की, निवडणुकीत मतदारसंघातील साडेतीन लाख नावे वगळण्यात आली. विशेष म्हणजे जी नावे वगळण्यात आली ते त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक होते. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस हे आता गडकरी यांना याबाबत जाब विचारणार का?
विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते
गडकरी यांचा व्हिडीओ एक्सवर केला पोस्ट
ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी घेतलेल्या एका मुलाखतीत गडकरी यांनी दावा केला आहे की, त्यांच्या मतदारसंघातील ज्या साडेतीन लाख मतदारांची नावे वगळण्यात आली, त्यामध्ये त्यांच्या नातेवाईकांचा आणि भाच्याच्या नावाचा समावेश आहे.