मुंबई : रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासह प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचीही जबाबदारी रेल्वे सुरक्षा दल चोख पार पाडतात. ‘मिशन जीवन रक्षक’ या मोहिमेअंतर्गत एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत स्वत:चा जीव धोक्यात घालून आतापर्यंत ४४ लोकांचे प्राण वाचवले आहेत. या ४४ घटनांपैकी एकट्या मुंबई विभागात जीव वाचवणाऱ्या एकूण २१ घटनांची नोंद झाली आहे. भुसावळ विभागात १५, पुणे विभागात ४ तर नागपूर विभागात २ आणि सोलापूर विभागात २ जीव वाचवण्याच्या घटनांची नोंद झालेली आहे.
रेल्वे सुरक्षा बलाच्या या जवानांना प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेवरील गुन्हे, अतिरेकी हिंसाचार, ट्रेनच्या वाहतुकीत होणारा अडथळा, हरवलेल्या मुलांची सुटका तसेच रेल्वेमध्ये आणि रेल्वे परिसरात अमली पदार्थ जप्त करणे, प्रवाशांचे सामान परत मिळवणे इत्यादी विविध सुरक्षा आव्हानांचा सामना करावा लागतो आणि त्याप्रमाणे ते आपले लक्ष प्रवाशांच्या सुरक्षेवर केंद्रित करतात.
रेल्वे सुरक्षा बलाच्या सतर्कतेने बहुतेक प्रकरणांमध्ये अशा प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत, जे काही वेळा मोठा निष्काळजीपणा करतात आणि धावत्या ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना धोक्याचा मार्ग पत्करतात. काही वेळा विविध वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्येचा प्रयत्न करतानादेखील रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी अनेक लोकांचा जीव वाचवला आहे. शेवटी, एखाद्याचा जीव वाचवण्याच्या या कृतीचा, रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांप्रती आनंद आणि कृतज्ञता वाढवतो.