'मिशन मॅनहोल'आजपासून सुरू तज्ज्ञ वकील व सहाय्यक आयुक्त पहाणी करणार

निर्देश पालिका आयुक्तांनी विभागीय सहाय्यक आयुक्तांना दिले असून सोमवारी रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिले आहेत
'मिशन मॅनहोल'आजपासून सुरू तज्ज्ञ वकील व सहाय्यक आयुक्त पहाणी करणार

मुंबई : मॅनहोल उघडी की बंदीस्त याचा रिपोर्ट सोमवारी सकाळी १० वाजेपर्यंत सादर करण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी सहाय्यक आयुक्त व संबंधित विभागाला दिले आहेत. तसेच सहायक आयुक्तांनी पहाणी केल्यानंतर मॅनहोल बंदीस्त की, उघडी याची तपासणी उच्च न्यायालयाने नेमून दिलेले तज्ज्ञ वकील व सहाय्यक आयुक्त सोमवारपासून करणार आहेत. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात वेळोवेळी कान उघडणी केल्यानंतर अखेर उघड्या मॅनहोलचा प्रश्न मुंबई महापालिकेने गांभीर्याने घेतला आहे.

उघड्या मॅनहोल मध्ये पडून मृत्यू होण्याच्या घटना टाळण्यासाठी काय उपाययोजना केल्या याची विचारणा करत मुंबई महापालिकेच्या कार्यपद्धतीवर मुंबई उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले. न्यायालयाने फटकारल्यानंतर उघड्या मॅनहोलची गंभीर दखल घेत आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी मॅनहोलवर संरक्षक जाळ्यांचा आढावा घेण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. आतापर्यंत मॅनहोल झाकणांसह सुमारे ६ हजार ३०८ हून अधिक मॅनहोलवर प्रतिबंधक जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. शहर व उपनगरातील आवश्यक मॅनहोलवर संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या असल्या तरी पुन्हा एकदा सर्व मॅनहोलची पाहणी करून, झाकणे व जाळ्या बसवण्यात आल्या का, याची खात्री करावी. असे निर्देश पालिका आयुक्तांनी विभागीय सहाय्यक आयुक्तांना दिले असून सोमवारी रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

तीन आठवड्यात न्यायालयात अहवाल

मॅनहोल विषयक कार्यवाहीचा पडताळणी अहवाल मुंबई उच्च न्यायालयात तीन आठवड्यांच्या आत अहवाल सादर करावयाचा आहे. त्याअनुषंगाने न्यायालयाकडून विभागनिहाय नियुक्त तज्ज्ञ वकील तसेच संबंधित सहायक आयुक्त यांनी संयुक्त पाहणी केलेला अहवाल त्यांच्या संयुक्त स्वाक्षरीने प्रशासन न्यायालयाला सादर करणार आहे.

एकूण मॅनहोल : १ लाख २८६

मलनिःसारण विभाग : ७४ हजार ६९३

पर्जन्य जलवाहिन्या विभाग : २५ हजार ५९३

संरक्षक जाळ्या बसवल्या

मलनिःसारण विभाग : १ हजार ९०८

पर्जन्य जलवाहिन्या विभाग : ४ हजार ४००

एकूण : ६ हजार ३०८

logo
marathi.freepressjournal.in