बोगस अकाऊंट उघडून प्रफुल्ल पटेल यांच्या नावाचा गैरवापर, गुन्हा दाखल होताच जुहूच्या हॉटेल व्यावसायिकाची चौकशी सुरू

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या अजित पवार गटातील विद्यमान खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नावाने गैरवापर करून फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे.
प्रफुल पटेल
प्रफुल पटेलसंग्रहित फोटो
Published on

मुंबई : बोगस व्हॉट‌्सॲप अकाऊंट उघडून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या अजित पवार गटातील विद्यमान खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नावाने गैरवापर करून फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र सायबर सेल विभागात गुन्हा दाखल होताच राहुल कांत या हॉटेल व्यावसायिकाला सायबर सेल पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. चौकशीत त्याने या गुन्ह्यांची कबुली देताना झटपट पैशांसाठी त्याने प्रफुल्ल पटेल यांचे बोगस व्हॉट‌्सॲप अकाऊंट सुरू असल्याची कबुली दिली.

गेल्या काही दिवसांपासून प्रफुल्ल पटेल यांच्या नावाने एक व्हॉट‌्सॲप अकाऊंट उघडण्यात आला होता. त्यात त्यांचा फोटोचा गैरवापर करून पैशांची मागणी केली जात होती. त्यासाठी या अज्ञात व्यक्तीने विदेशातील लोकांना टार्गेट केले होते. तीन दिवसांपूर्वी हा प्रकार उघडकीस येताच प्रफुल्ल पटेल यांच्या वतीने विवेक अग्निहोत्री यांनी महाराष्ट्र सायबर सेल विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत सायबर पोलिसांना गुन्हा दाखल करून तपासाचे आदेश दिले होते. या आदेशांनतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. तांत्रिक माहितीवरून पोलिसांनी राहुल कांत या व्यावसायिकाला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते.

चौकशीत राहुल हा हॉटेल व्यावसायिक असून, तो जुहू परिसरात त्याच्या कुटुंबीयांसोबत राहतो. त्याचा हॉटेलचा व्यवसाय होता; मात्र कोरोना काळात त्याला प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते. त्यात त्याच्या आजारी आईच्या औषधोपचारासाठी प्रचंड खर्च येत होता. व्यवसायातील नुकसान भरून काढणे तसेच आईच्या औषधोपचारासाठी त्याला पैशांची गरज होती. त्यामुळे झटपट पैशांसाठी त्याने प्रफुल्ल पटेल यांचे बोगस व्हॉट‌्सॲप अकाऊंटच्या माध्यमातून फसवणुकीचा धंदा सुरू केला होता. या अकाऊंटवरून त्याने कतारच्या राजकुमाराच्या सल्लागाराकडे पैशांची मागणी करून त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला होता.

logo
marathi.freepressjournal.in