मिठी नदीतील गैरव्यवहारप्रकरणी ईडी चौकशीला सुरुवात; एसआयटीकडून कागदपत्रे घेतली ताब्यात

मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्याच्या प्रकल्पात कथित अनियमितता आणि निधीच्या गैरव्यवहाराप्रकरणी सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) ने प्राथमिक चौकशीला सुरुवात केली आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्याच्या प्रकल्पात कथित अनियमितता आणि निधीच्या गैरव्यवहाराप्रकरणी सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) ने प्राथमिक चौकशीला सुरुवात केली आहे. यासाठी ईडीने याप्रकरणातील कागदपत्रे मुंबई पोलिसांच्या विशेष तपासाकडून (एसआयटी) कडून ताब्यात घेतली आहेत. दरम्यान या प्रकरणी पालिकेचे तीन अधिकारी, पाच कंत्राटदार , तीन मध्यस्थी व दोन कंपन्यांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गैरव्यवहारामुळे पालिकेला ६५ कोटी ५४ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.

मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी मागील २० वर्षापासून प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या कामासाठी एकूण १८ कंत्राटदाराना या काळात ११०० कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. त्यापैकी अनेकांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर एसआयटीने याप्रकरणी महापालिकेचे सहाय्यक अभियंता प्रशांत रामुगडे, उपमुख्य अभियंते गणेश बेंद्रे आणि तायशेट्टे (निवृत्त), तसेच अॅक्युट डिझायनिंग, कैलाश कन्स्ट्रक्शन कंपनी, एनए कन्स्ट्रक्शन, निखिल कन्स्ट्रक्शन आणि जेआरएस इन्फ्रास्ट्रक्चर या कंपन्यांचे संचालक दीपक मोहन, किशोर मेनन, जय जोशी, केतन कदम आणि भूपेंद्र पुरोहित यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यात जोशी, कदम व पुरोहित मध्यस्थी आहेत. आरोपींनी कट रचून पालिकेचे ६५ कोटी ५४ लाखांचे नुकसान केल्याचा आरोप आहे.

याप्रकरणाचा तपास विशेष तपास यंत्रणा करीत आहे. ईडीने प्राथमिक चौकशी सुरू केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in