Mumbai : मिठी नदी घोटाळा प्रकरण: ठेकेदार शेरसिंह राठोड याला अटक

मिठी नदी स्वच्छता घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ठेकेदार शेरसिंह राठोड याला अटक केली आहे.
Mumbai : मिठी नदी घोटाळा प्रकरण: ठेकेदार शेरसिंह राठोड याला अटक
Published on

मुंबई : मिठी नदी स्वच्छता घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ठेकेदार शेरसिंह राठोड याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीच्या एफआयआरमध्ये राठोड याचे नाव नव्हते; मात्र तपास पुढे सरकताच त्याच्याविरुद्ध महत्त्वाचे पुरावे हाती लागले. चौकशीनंतर त्याचा या प्रकरणातील सहभाग स्पष्ट झाला आणि शेरसिंह राठोड याला अटक करण्यात आली.

मिठी नदी स्वच्छता घोटाळा हा मुंबईतील मोठ्या घोटाळ्यांपैकी एक मानला जातो. नदी साफसफाईसाठी वापरल्या जाणाऱ्या मशीनरी भाड्याने घेण्यासाठी दिलेल्या निधीचा गैरवापर झाला. बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोचीस्थित मॅटप्रॉप टेक्निकल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून आलेल्या मशीनसाठी वाढीव दर अदा केले.

गाळ काढण्यासाठी मोठा प्रकल्प आखण्यात आला होता, परंतु तपासात अनेक अनियमितता उघड झाल्या. प्रत्यक्ष काम नदीत झाले नाही, तर कागदोपत्री दाखवून खोटे बिले सादर करून मोठ्या प्रमाणात रक्कम वळवण्यात आली. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे होता, नंतर तो आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला.

तपास अधिकाऱ्यांच्या मते, हा गैरव्यवहार मुंबई महापालिकेतील काही अधिकारी आणि मॅटप्रॉप कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या संगनमताने झाला. बीएमसीकडे फुगवून बिल सादर करण्यात आले. या संपूर्ण प्रकरणात बॉलिवूड अभिनेता दिनो मोरिया याचेही नाव समोर आले होते. ईओडब्ल्यूने त्यांची चौकशी केली होती. याआधी या प्रकरणातील दोन दलालांना अटक करण्यात आली होती. त्यातील एकाच्या चौकशीत मिळालेल्या कागदपत्रांमध्ये दिनो मोरिया आणि त्यांच्या भावाच्या कंपनीचे नाव समोर आले होते.

logo
marathi.freepressjournal.in