मिठी नदी भ्रष्टाचारप्रकरणी स्थायी समितीचीही चौकशी; २००६ पासून होणार चौकशी, उदय सामंत यांची माहिती

मिठी नदीतील गाळ उपसा व स्वच्छता कामांमध्ये ३ वर्षांत तब्बल ६५ कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. या भ्रष्टाचाराची सुरुवात २०१२ पासून झाली असून यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीची चौकशी करण्याबाबत विशेष चौकशी पथकाला (एसआयटी) सूचना देण्यात येतील. त्याचप्रमाणे या प्रकरणाची चौकशी २००६ पासून करण्यात येईल, असे आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिले.
मिठी नदी भ्रष्टाचारप्रकरणी स्थायी समितीचीही चौकशी; २००६ पासून होणार चौकशी, उदय सामंत यांची माहिती
Published on

मुंबई : मिठी नदीतील गाळ उपसा व स्वच्छता कामांमध्ये ३ वर्षांत तब्बल ६५ कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. या भ्रष्टाचाराची सुरुवात २०१२ पासून झाली असून यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीची चौकशी करण्याबाबत विशेष चौकशी पथकाला (एसआयटी) सूचना देण्यात येतील. त्याचप्रमाणे या प्रकरणाची चौकशी २००६ पासून करण्यात येईल, असे आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिले.

मिठी नदीतील गाळ उपसा प्रकरणामध्ये अनियमितता झाल्याबाबत सदस्य प्रसाद लाड यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला मंत्री सामंत यांनी उत्तर दिले. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य प्रवीण दरेकर, भाई जगताप, अनिल परब यांनी भाग घेतला. या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री सामंत म्हणाले की, या प्रकरणाची विशेष चौकशी पथकामार्फत चौकशी सुरू असून या समितीने ३ लाख ४४ हजार डंपरचे फोटो तपासले असून यामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. नदीतून १६ लाख ७० हजार मेट्रिक टन गाळ काढला असून तो गेला कुठे, यावरून तपास अधिकारी संभ्रमात पडले आहेत. महानगरपालिकेने मिठी नदीतील गाळ डंपिंग ग्राऊंडऐवजी कंत्राटदार निश्चित करेल त्या खासगी जागेवर टाकावा, असा निर्णय २०१२ मध्ये घेतला. तेव्हापासून या भ्रष्टाचाराला सुरुवात झाल्याचे सामंत यांनी सांगितले.

सदस्य अनिल परब यांनी या प्रकरणात २००६ पासून स्थायी समितीमध्ये कोण होते त्यांचीही चौकशी करण्याची मागणी केली. यावर सामंत यांनी सांगितले की, २०१९ ते २०२१ या तीन वर्षांत ६५ कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे स्थायी समितीचीही चौकशी करण्यात येईल. तसेच २००६ पासून ही चौकशी होईल. यासोबतच या प्रकरणात जे अटकेत आहेत त्यांचे संबंध कोणासोबत आहेत आणि बाहेर असलेल्यांचे संबंध कोणाबरोबर आहेत, याचीही चौकशी करण्याच्या सूचना ‘एसआयटी’ला देण्यात येतील, असेही सामंत यांनी नमूद केले.

logo
marathi.freepressjournal.in