मिठीचे पाणी नदीतच रोखणार: २८ फ्लड गेट्स बसवणार; दोन हजार कोटी रुपये खर्च करणार

फ्लड गेट्स बसवल्यानंतर मिठी नदीशेजारीला रहिवाशांना पावसाळ्यात मोठा दिलासा मिळणार आहे.
मिठीचे पाणी नदीतच रोखणार: २८ फ्लड गेट्स बसवणार; दोन हजार कोटी रुपये खर्च करणार

मुंबई : मिठी नदी शेजारी राहणाऱ्या रहिवाशांना पूरस्थितीचा सामना करावा लागू नये यासाठी मिठी नदीशेजारी फ्लड गेट्स बसवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. एकूण २८ ठिकाणी फ्लड गेट्स बसवण्यात येणार असून, यासाठी दोन हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. फ्लड गेट्स बसवल्यानंतर मिठी नदीशेजारीला रहिवाशांना पावसाळ्यात मोठा दिलासा मिळणार आहे.

२६ जुलै, २००५ मध्ये मुंबईत ढगफुटी झाली आणि मुंबई पाण्याखाली गेली. शेकडो मुंबईकर महाप्रलयात वाहून गेले, तर कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. ढगफुटीनंतर मिठी नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आणि नदी शेजारील परिसर जलमय झाला. या भयावह आपत्कालीन परिस्थितीनंतर मिठी नदीचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. मिठी नदीतील सांडपाणी, रसायन मिश्रीत पाणी रोखण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजनाही केल्या जात आहेत. विहार तलावापासून माहीम खाडीपर्यंत नदी विस्तारली असून, ही नदी अंधेरी, वांद्रे, कुर्ला परिसरातून जाते. त्यामुळे माहीम खाडीपासून सुरू होणाऱ्या भरती-ओहोटीच्या क्षेत्रासह अन्य भागात फ्लडगेट्स बसविण्याचे नियोजन पालिकेचे आहे. या परिसरात फ्लडगेट्स उभारल्याने भरतीच्या वेळेस हे दरवाजे बंद केल्यास नदीतील पर्जन्य जलवाहिन्यांतून पाणी रोखण्यास मदत होईल. ओहोटीच्या वेळेस हे दरवाजे उघडून पर्जन्य जलवाहिन्यांमधील पाणी नदीत जाण्यास मदत होणार आहे. तसेच पाणी ओव्हरफ्लो होऊन रेल्वे रुळांवर जाणार नाही. वाहतूकही सुरळीत राहील. त्यामुळे मिठी नदीवर फ्लडगेट्स बसविण्यात येणार आहे. या फ्लडगेट्समुळे पावसाळ्यात शहरात भरणारे पाणी रोखण्यास याची मदत होणार आहे.

...म्हणून मिठी नदीला नाल्याचे स्वरूप

मिठी नदीच्या एकूण प्रवाहमार्गाच्या परिसरात झोपड्या वसल्या आहेत. या ठिकाणाहून जलप्रवाह, सांडपाणी मिठी नदीत येते. तसेच, मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकसह विविध प्रकारचा कचरा मिठी नदीत टाकला जातो. विविध भागांत कचरा अडकून राहतो. मुसळधार पावसात मिठीला पूरस्थिती निर्माण होते. मुंबईतील सांडपाणी ही मिठी नदीत सोडले गेल्यामुळे या नदीला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in