
काही वर्षांपूर्वी मंत्रालयात अधिकाऱ्याला मारहाण केल्याच्या प्रकरणात आमदार बच्चू कडू शनिवारी मुंबई सत्र न्यायालयात हजर झाले. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने बच्चू कडू यांनी २०११ मध्ये मंत्रालयाच्या एका सचिवाला मारहाण केली होती. त्या संदर्भात मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
मागील अनेक सुनावणीमध्ये बच्चू कडू हे काही कारणास्तव अनुपस्थित राहिले होते. कोर्टाने त्यांना शनिवारी उपस्थित राहण्यास आदेश दिला होता. यावेळेला उपस्थित राहिले नसते तर त्यांच्याविरोधात वॉरंट काढण्यात येणार होते. त्यामुळे बच्चू कडू यांनी सत्र न्यायालयात हजेरी लावली. मुंबई सत्र न्यायालय विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर सुरू असलेल्या सुनावणीसाठी बच्चू कडू हजर होते. या प्रकरणात सत्र न्यायालयाने पुढची सुनावणी सहा ऑगस्ट रोजी निश्चित केली आहे. पुढच्या तारखेला मी आवर्जून उपस्थित राहणार, असेही बच्चू कडू म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्रिपद भूषवणारे बच्चू कडू यांची शिंदे-फडणवीस सरकारमध्ये वर्णी लागण्याची शक्यता आहे.