आमदार अपात्रता सुनावणीला मुदतवाढ ;सुप्रीम कोर्टाने १० जानेवारीपर्यंत वेळ वाढवला

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंबंधी निर्णय घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती.
आमदार अपात्रता सुनावणीला मुदतवाढ ;सुप्रीम कोर्टाने १० जानेवारीपर्यंत वेळ वाढवला

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीसाठी यापूर्वी ३१ डिसेंबरची मुदत सुप्रीम कोर्टाने आखून दिली होती. आता ही मुदत १० जानेवारीपर्यंत वाढवून देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने जाहीर केला.

सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना १० जानेवारीपर्यंत वेळ वाढवून दिला आहे. आमदार अपात्रताप्रकरणी निकाल देण्यासाठी मिळालेला वेळ हा पुरेसा नसून त्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी तीन आठवड्यांची वाढीव वेळ मागितली होती. मात्र, कोर्टाने १० जानेवारीपर्यंतच वेळ दिला आहे. त्यामुळे शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा फैसला आता १० जानेवारीपर्यंत होणार असल्याचे चित्र आहे.

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंबंधी निर्णय घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती. या प्रकरणात जवळपास दोन लाख कागदपत्रे असून ती तपासावी लागतील, असे कारण देऊन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी त्यासंबंधित निकाल देण्यासाठी वेळ वाढवून द्यावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने आता १० जानेवारीपर्यंत वेळ वाढवून दिला आहे.

राहुल नार्वेकरांनी निर्णय देण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडे वेळ वाढवून मागितली. ते म्हणाले की, आमदार अपात्रतेप्रकरणी मी २० जानेवारीपर्यंत युक्तिवाद संपवणार असून त्यावर निकाल राखून ठेवणार आहे. पण या प्रकरणात दोन लाख कागदपत्रे तपासावी लागणार असल्याने ३१ डिसेंबरपर्यंत निकाल देणे मला शक्य होणार नाही. त्यामुळे तीन आठवड्यांचा वेळ वाढवून द्यावा.

logo
marathi.freepressjournal.in