
गणपती विसर्जनानंतर दादर पोलीस ठाण्यासमोर झालेल्या राडा आणि गोळीबारानंतर पोलिसांनी आमदार सदा सरवणकर यांचे पिस्तूल ताब्यात घेतले आहे. हे पिस्तूल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल आल्यानंतर काही गोष्टींचा खुलासा होणार आहे. दरम्यान, या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत दादर पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहेत.
गणपती विसर्जनादरम्यान प्रभादेवी येथे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांमध्ये राडा झाला होता. या राड्यानंतर दुसऱ्या दिवशी सदा सरवणकर हे त्यांच्या समर्थकांसह पोलीस ठाण्यात आले होते. यावेळी तिथे काही शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी त्यांच्यात पुन्हा शाब्दिक बाचाबाची झाली. याचदरम्यान अज्ञात व्यक्तीने पिस्तूलमधून हवेत एक गोळीबार केला होता. हा गोळीबार सदा सरवणकर यांनी केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. विद्यमान आमदाराने पोलीस ठाण्यासमोरच गोळीबार केल्याच्या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत तपासाला सुरुवात केली आहे.