
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर त्यांच्या गटात सामील झालेल्या आमदारांच्या कार्यालयांवर तसेच त्यांच्या पोस्टरवर शिवसैनिक राग काढत आहेत. त्यातच आता पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांना मात्र वेगळ्याच संकटाला सामोरे जावे लागले आहे. आपल्याच फेसबुक पेजवर वनगा यांचा उल्लेख ‘गद्दार’ म्हणून करण्यात आला आहे.
“शिवसेना आणि कट्टर शिवसैनिकांच्या जीवावर निवडून येऊनसुद्धा शिवसेनेसोबत बंडखोरी करणारा, सामान्य जनतेसोबत लबाडी करणारा स्वार्थी श्रीनिवास तू गद्दार आहेस, गद्दार,” असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. वनगा यांच्या पेजवर सुमारे नऊ हजार फॉलोअर्स असून ते फेसबुकवर फारसे सक्रिय नसतात. त्यांचे फेसबुक अकाऊंट अन्य कुणी चालवत असावा, त्यानेच वनगा यांची खिल्ली उडवली आहे.
पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने श्रीनिवास यांना उमेदवारी देण्यास नकार दिला. श्रीनिवास यांच्याऐवजी राजेंद्र गावित यांना भाजपने उमेदवारी दिली आणि या निवडणुकीत वनगा यांनी दोन लाखांचे मताधिक्य मिळवले होते. मात्र गावित यांच्याकडून श्रीनिवास यांना पराभव पत्करावा लागला.