

अभिषेक पाठक/मुंबई
मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) तपासणी करण्यात आलेल्या जवळपास पाचपैकी एका वाहनाकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे. वाहनांमुळे होणाऱ्या वायुप्रदूषणाला आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात विशेष तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत ११ प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी (आरटीओ) एकूण ३१ हजार ८९९ वाहनांची तपासणी केली. त्यापैकी ५ हजार ८२१ वाहनांमध्ये नियमांचे उल्लंघन आढळले. संबंधित वाहनांवर एकूण ६ कोटी २० लाख ९० हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला असून, त्यापैकी १ कोटी ९२ लाख १७ हजार ४९० रुपयांची वसुली झाली आहे.
मुंबईतील वायुप्रदूषणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीच्या निर्देशानंतर परिवहन विभागाने तपासणी अधिक तीव्र केली आहे. वाहनांकडे वैध प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी), योग्यता प्रमाणपत्र आणि परवाने आहेत की नाही, याची पडताळणी करण्यात येत आहे. तसेच बांधकाम साहित्य आणि इतर सुटे साहित्य वाहून नेताना योग्य आच्छादन न करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात आहे. क्षमतेपेक्षा अधिक माल वाहून नेणाऱ्या वाहनांवरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
परिवहन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, परिवहन आयुक्त कार्यालयाकडून २३ ऑक्टोबरला नव्याने निर्देश जारी होण्यापूर्वीच तपासणी सुरू करण्यात आली होती. यासंदर्भात १ ऑक्टोबरला आयुक्त कार्यालयात बैठक झाली होती. त्यानंतर प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना मोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. तपासणी केलेली वाहने, आढळलेले उल्लंघन, वाहनांचे प्रकार, आकारलेला दंड आणि वसूल झालेली रक्कम यांची दररोज नोंद ठेवण्यासही सांगण्यात आले आहे. याशिवाय, मोहिमेच्या अंमलबजावणीबाबत मासिक अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कारवाईच्या आकडेवारीनुसार, पनवेल आरटीओने सर्वाधिक १ हजार १७० वाहनांमधील नियमभंग उघडकीस आणला. त्यानंतर ठाणे येथे ९१२, तर मुंबई पूर्व येथे ६८४ वाहनांमध्ये उल्लंघन आढळले. दंडाच्या रकमेतही पनवेल कार्यालय आघाडीवर असून, तेथे १ कोटी ६ लाख २४ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. वसई आरटीओने ९२ लाख ३७ हजार रुपयांचा दंड ठोठावला. मीरा-भाईंदर कार्यालयाच्या हद्दीत तपासणी केलेल्या १ हजार १२ वाहनांपैकी ९२ वाहनांमध्ये नियमभंग आढळला.
दंडवसुलीचे प्रमाण अवघे ३१ टक्के
नियमभंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई झाली असली, तरी प्रत्यक्ष वसुलीचे प्रमाण तुलनेने कमी आहे. आकारण्यात आलेल्या ६ कोटी २० लाख ९० हजार ५०० रुपयांच्या दंडापैकी आतापर्यंत १ कोटी ९२ लाख १७ हजार ४९० रुपये वसूल झाले आहेत. म्हणजेच एकूण दंडाच्या सुमारे ३०.९५ टक्के रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे नियमांची अंमलबजावणी करण्याबरोबरच दंडवसुलीसाठीही सातत्याने पाठपुरावा करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
मुंबई महानगर प्रदेशातील आरटीओ तपासणी
तपासलेली वाहने - ३१,८९९
नियमभंग करणारी वाहने - ५,८२१
एकूण दंड - ₹६.२० कोटी
दंडवसुली - ₹१.९२ कोटी
नियमभंगाचे प्रमाण - १८.२५%
कालावधी - १ ते १५ ऑक्टोबर २०२६
वाहनांमधून उडणारी धूळ चिंताजनक
वाहनांमधून होणारे उत्सर्जन आणि रस्त्यांवर उघड्यावरून वाहून नेल्या जाणाऱ्या बांधकाम साहित्यामुळे निर्माण होणारी धूळ, हे मुंबई महानगर प्रदेशातील प्रदूषणाचे चिंतेचे विषय आहेत.