
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) राबविण्यात येत असलेल्या डी. एन. नगर-मंडाले या ‘मेट्रो-२ब’ मार्गाचे काम रडतखडत सुरू आहे. प्रकल्पाची अनेक कामे शिल्लक असतानाच, एमएमआरडीएने या प्रकल्पातील चेंबूर-डायमंड गार्डन ते मंडाले-मानखुर्द या स्थानकांदरम्यान मेट्रो चाचणीला बुधवारपासून सुरुवात केली. अनेक ठिकाणी प्रकल्प रडतखडत चालू असतानाच एमएमआरडीएने चेंबूर मानखुर्ददरम्यान मेट्रो सुरू करण्याचा घाट घातला आहे.
डी. एन. नगर-मंडाले ‘मेट्रो-२ब’ हा मार्ग २३ किलोमीटरचा असून यामध्ये एकूण २० उन्नत स्थानकांचा समावेश आहे. हा मार्ग पश्चिम द्रूतगती मार्ग, पूर्व द्रूतगती मार्ग, पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, मोनोरेल, दहिसर ते डी. एन. नगर मेट्रो २ अ, कुलाबा ते सिप्झ मेट्रो मार्ग ३ आणि वडाळा ते कासारवडवली मेट्रो मार्ग ४ या महत्त्वाच्या मार्गांना जोडणारा आहे. तसेच हा मार्ग पूर्व उपनगर व पश्चिम उपनगर यांना जोडणारा आहे.
प्रकल्पाचे अनेक ठिकाणी काम अपूर्णच
या मार्गाचे काम वांद्रे, जुहू, बीकेसी, कुर्ला, अशा विविध ठिकाणी अपूर्ण आहे. हे काम पूर्ण होण्यास आणखी एक वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या हा प्रकल्प अपूर्ण अवस्थेत असतानाच, बुधवारपासून प्रकल्पातील चेंबूर-डायमंड गार्डन ते मंडाले-मानखुर्द या स्थानकांदरम्यान मेट्रोच्या चाचणीला सुरुवात करण्यात आली. डायमंड गार्डन, शिवाजी चौक, बीएसएनएल मेट्रो, मानखुर्द आणि मंडाले या पाच स्थानकांदरम्यान मेट्रो धावली. मेट्रो रेल सुरक्षा आयुक्तांमार्फत सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ही मेट्रो प्रवासी सेवेत दाखल होणार आहे.