मेट्रो-५ मार्गिकेच्या कामाला वेग; उल्हासनगर मेट्रो विस्तार ४८ महिन्यांत होणार पूर्ण

‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’ने (एमएमआरडीए) मेट्रो मार्गिका-५ चा उल्हासनगरपर्यंत विस्तार करण्यासाठी पावले उचलली असून या नवीन मार्गिकेच्या बांधकामाची तयारी सुरू केली आहे.
मेट्रो-५ मार्गिकेच्या कामाला वेग; उल्हासनगर मेट्रो विस्तार ४८ महिन्यांत होणार पूर्ण
मेट्रो-५ मार्गिकेच्या कामाला वेग; उल्हासनगर मेट्रो विस्तार ४८ महिन्यांत होणार पूर्णप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

स्वीटी भागवत/मुंबई

‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’ने (एमएमआरडीए) मेट्रो मार्गिका-५ चा उल्हासनगरपर्यंत विस्तार करण्यासाठी पावले उचलली असून या नवीन मार्गिकेच्या बांधकामाची तयारी सुरू केली आहे. भिवंडीतील धामणकर नाका ते उल्हासनगर दरम्यानच्या मेट्रो मार्गिकेच्या बांधकामासाठी कंत्राटदार नियुक्त करण्याची प्रक्रिया प्राधिकरणाने सुरू केली आहे.

११ जुलै रोजी एमएमआरडीआने मेट्रो मार्गिका ५ च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मेट्रो मार्गिका आणि स्थानक बांधकामाच्या नागरी कामांसाठी निविदा मागवल्या आहेत. निविदेच्या अटींनुसार, यशस्वी कंत्राटदाराला हे काम ४८ महिन्यांच्या आत पूर्ण करावे लागणार आहे.

ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगरदरम्यान ३४.२१ किलोमीटर अंतराची मेट्रो मार्गिका-५ असून त्यावर एकूण १९ स्थानके असणार आहेत.

या प्रकल्पाची तीन टप्प्यांत विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ठाण्यातील कापूरबावडी ते भिवंडीतील धामणकर नाका दरम्यानचे नागरी काम पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात आले आहे.

दुसऱ्या टप्प्यांतर्गत भिवंडीतील धामणकर नाका ते कल्याणमधील दुर्गाडी चौक दरम्यान मेट्रो मार्गिका तयार केली जाणार असून या टप्प्याची दोन पॅकेजमध्ये विभागणी केली आहे.

पहिल्या पॅकेजमध्ये धामणकर नाका ते रांजणोली जंक्शन या भागाचा समावेश असून यात ३ किलोमीटर भुयारी भागासह उन्नत मार्गिका, एक भुयारी स्थानक आणि एका उन्नत स्थानकाचे बांधकाम केले जाईल. दुसऱ्या पॅकेजमध्ये रांजणोली जंक्शन ते दुर्गाडी चौक दरम्यान चार उन्नत स्थानके आणि खाडीवर पूल बांधला जाणार आहे.

तिसऱ्या टप्प्यातील कामे

तिसऱ्या टप्प्यात दुर्गाडी चौक-कल्याण-भोईवाडामार्गे उल्हासनगरपर्यंतचा मार्ग समाविष्ट आहे. एकूण ११.८३ किमी लांबीच्या या मेट्रो मार्गावर चार उन्नत (एलिव्हेटेड) मेट्रो स्थानके उभारण्यात येणार आहेत.

दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील कामांसाठी निवडण्यात येणाऱ्या कंत्राटदाराला हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ४८ महिन्यांचा कालावधी दिला जाणार आहे.

एमएमआरडीएने ठाणे-भिवंडी या पहिल्या टप्प्यातील मार्गावर २०२६ च्या अखेरीस मेट्रोची चाचणी सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

एमएमआरडीएच्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यातील मार्ग कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी यांच्या तपासणीसाठी जवळपास सज्ज झाला आहे. या टप्प्यातील ९७ टक्क्यांहून अधिक नागरी कामे पूर्ण झाली असून, सध्या मार्गावर ओव्हरहेड विद्युत खांब आणि त्यासंबंधित विद्युत यंत्रणांच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in