
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) २०२४–२५ या आर्थिक वर्षात प्रवासी भाड्याव्यतिरिक्त मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये तिप्पट वाढ झाली आहे. प्रवासी भाड्याव्यतिरिक्त मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये १२२ कोटींची भरघोस वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या ४२.५ कोटी उत्पन्नात यंदा थेट १८७ टक्के वाढ झाली आहे. या विक्रमी वाढीमुळे एमएमआरडीएने प्रवाशांना सुलभ सेवा देणारी मेट्रो व्यवस्था उभारण्याच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे.
एमएमआरडीएचा एकूण ऑपरेशनल रेव्हेन्यू १९० कोटींवरून वाढून थेट २९२ कोटींवर पोहोचला आहे. म्हणजे आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला ठरवलेले २०० कोटींचे लक्ष्य मोठ्या फरकाने ओलांडण्यात आले आहे. २०२४–२५ या आर्थिक वर्षात नॉन-फेअर रेव्हेन्यूमध्ये ऑप्टिकल फायबर केबल परवाना शुल्क ६१.७२ कोटी, स्थानकांवरील जाहिराती २३.९५ कोटी, गाड्यांवरील (आतील आणि बाहेरील) जाहिराती ७.४७ कोटी, खाजगी रिटेल आऊटलेट्स आणि किऑस्क ८.२२ कोटी, स्थानक नामकरण व ब्रँडिंग अधिकार ९.७६ कोटी, कर्मचाऱ्यांचे कार्यक्षम व्यवस्थापन ५.४३ कोटी, टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर उत्पन्न ४.५२ कोटी इतर उत्पन्न (चित्रीकरणाची परवानगी, स्मॉल सेल, प्रमोशन्स) ०.६५ कोटी रुपयांचा समावेश आहे.
प्रवासी भाड्यांतून मिळणारे उत्पन्न १४७ कोटींवरून वाढून १७० कोटींवर पोहोचले असून, ही १५.६ टक्क्यांची वाढ आहे. यासोबतच नॉन-फेअर रेव्हेन्यू (तिकीटाव्यतिरिक्त मिळणारे उत्पन्न )मध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे मेट्रोचे परवडणारे तिकीट दर कायम ठेवण्यास मदत होणार आहे.
एमएमआरडीएच्या उल्लेखनीय आर्थिक कामगिरीतून महाराष्ट्राला कार्यक्षम, सर्वसमावेशक आणि शाश्वत शहर वाहतुकीचा आदर्श बनवण्याचे आमचे उद्दिष्ट अधोरेखित होते. नवकल्पनांवर आधारित मॉनिटायझेशन (उत्पन्ननिर्मिती) आणि कार्यक्षम संचालनाच्या माध्यमातून आम्ही जागतिक दर्जाची आणि प्रवाशांना प्राधान्य देणारी मेट्रो व्यवस्था विकसित करत आहोत.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
नॉन-फेअर रेव्हेन्यूमधील तिप्पट वाढ हे आर्थिक यश तर आहेच, त्याचप्रमाणे सातत्याने प्रगती करणारी, आधुनिक मेट्रो व्यवस्था उभारण्याच्या आमच्या व्हिजनचे द्योतक आहे. मुंबईकरांसाठी भक्कम पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या आणि शहरी जीवनमानाचा दर्जा वाढविण्याच्या एमएमआरडीएची दृढ बांधिलकी यातून दिसून येते.
- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री