
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ब्रूकफील्ड या जागतिक पातळीवरील आघाडीच्या गुंतवणूक फर्मसोबत सामंजस्य करार केला. या करारांतर्गत १२ अब्ज डॉलरची (१ लाख ०३ हजार ८०० कोटी) थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) करण्यात आली आहे. मुंबई महानगर प्रदेश येत्या ५ ते ७ वर्षांत जागतिक पातळीवरील आर्थिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी या गुंतवणुकीचा वापर करण्यात येणार आहे.
एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी या उपक्रमाचे नेतृत्व केले. ब्रूकफील्डचे सीईओ अनुज राजन यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी (भाप्रसे) यांच्या पुढाकाराने दावोस येथे आयोजित वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या वार्षिक परिषदेत सलग दुसऱ्या वर्षी एमएमआरडीएने सहभाग घेतला होता. या परिषदेत एमएमआरडीएने तब्बल ४० अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले. एमएमआरडीएच्या स्थापनेचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे.
मेट्रो प्रकल्प, रस्ते, पूल, शहरी पायाभूत सुविधा, रिअल इस्टेट, ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट (सार्वजनिक परिवहन सेवा केंद्राभोवती केलेली विकास कामे), लँड व्हॅल्यू कॅप्चर संधी (पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे ज्या जमिनीची किंमत वाढते, त्या मूल्यवाढीतून महसूल निर्माण करण्याची प्रक्रिया), शाश्वत ब्लू व ग्रीन पायाभूत सुविधा (जलस्रोतांशी संबंधित आणि पर्यावरणपूरक घटकांशी संबंधित पायाभूत सुविधा) विकसित करण्यावर या सहयोगाद्वारे भर देण्यात येणार आहे.
गुंतवणुकीतून या प्रकल्पांची कामे
३२३.२४ चौ. किमी क्षेत्रफळात विस्तारलेल्या कर्नाळा-साई- चीरनेर या क्षेत्रांमध्ये प्रस्तावित असलेले मुंबई ३.० चे मुंबई महानगर प्रदेशातील नवे शहरी विकास प्रकल्प, मुंबई महानगर प्रदेशाच्या उत्तर आणि दक्षिण भागात विशेष नियोजन क्षेत्रे (एसपीए) विकसित करण्यासाठी गुंतवणुकीचा मोठा भाग वळविण्यात येईल. या प्रकल्पांमध्ये निवासी, व्यावसायिक, मिश्र-वापर विकास प्रकल्प, लॉजिस्टिक्स पार्क, डेटा सेंटर्स, ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स (जीसीसी) यांचा समावेश असेल. तसेच प्रत्यक्ष, डिजिटल व सामाजिक पायाभूत सुविधा विकास करण्यावर भर देण्यात येईल.