
शिवसेनेचे बंडखोर आमदार आता राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सामील होण्याची शक्यता आहे. शिंदे गटाला दोन तृतीयांशपेक्षा जास्त म्हणजेच ३८ आमदारांचा पाठिंबा असला तरी विधानसभेत वेगळ्या पक्षाची मान्यता मिळणे सोपे नाही. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंशी तीन वेळा फोन करून चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेच्या नावावर राजकारण करणाऱ्या शिंदे गटाला ठाकरे नाव आणि हिंदुत्व दोन्ही सोडायचे नाही. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे गटातील ३८ आमदार राज ठाकरेंच्या मनसेत प्रवेश करू शकतात, अशी चर्चा सुरू आहे.
...तर ती ऐतिहासिक गोष्ट असेल - संजय राऊत
“बंडखोर आमदार एमआयएम, समाजवादी पक्षातही जाऊ शकतात. आमदारकी वाचवायची असेल तर ते अशा पक्षात जाऊ शकतात. ज्या शिवसेनेने त्यांना जन्म दिला त्याचा ते द्वेष करत असतील तर महाराष्ट्राची माती त्यांना माफ करणार नाही. बंडखोरांमुळे मनसेला मुख्यमंत्रिपद मिळणार असेल तर ती ऐतिहासिक गोष्ट असेल,” असे याबाबत प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी म्हटले आहे.