गिरीश चित्रे / मुंबई
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दादर येथील शिवाजी पार्क मैदानात जाहीर सभा घेण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेने अर्ज केला होता. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मैदानासाठी अर्ज आधीच दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे फर्स्ट कम फर्स्ट या तत्त्वावर मनसेला शिवाजी पार्क मैदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवाजी पार्क मैदान मिळणारच नसल्याचे जी उत्तर विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे १७ नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्क मैदानात मनसेचे इंजिन धडाडणार आहे.
शिवसेना अन् शिवाजी पार्क मैदान अतुट नातं. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क मैदानातून अनेक सभा गाजल्या. शिवाजी पार्क मैदानातून बाळासाहेबांनी विरोधी पक्षांवर तोफ डागली. सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे.
मुंबईत ३६ मतदार संघ असून माहीम, वरळी, शिवडी, वर्सोवा या मतदार संघावर सगळ्यांचं राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. १८ नोव्हेंबर रोजी प्रचाराच्या तोफा थंडावतील. त्याआधी शिवाजी पार्क मैदानात १७ नोव्हेंबर रोजी जाहीर सभा घेण्यासाठी मनसे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पालिकेच्या जी उत्तर विभागाकडे अर्ज दाखल केला आहे. मात्र मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी १४ व १५ ऑक्टोबर रोजी मैदानासाठी अर्ज दाखल केला आहे. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अनिल देसाई यांनी १५ ऑक्टोबर रोजी मैदानात परवानगी मिळावी म्हणून अर्ज दाखल केला आहे.