मनसे’ने भाजपचे मनसुबे उधळले; मुंबई महापालिकेच्या २२७ जागा स्वबळावर लढणार

निवडणुकीत शिंदे गट व भाजपचा मनसेशी छुपा समझोता केला जाईल, अशी शक्यता वर्तवली जाते आहे.
मनसे’ने भाजपचे मनसुबे उधळले; मुंबई महापालिकेच्या २२७ जागा स्वबळावर लढणार

शिवसेनेला शह देण्यासाठीच शिंदे गट व भाजपने मनसेशी जवळीक वाढवली. मनसेला सोबत घेऊन यंदाच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सत्ता काबीज करण्याची रणनीती भाजपने आखली असताना ‘मनसे’ने मुंबई महापालिकेच्या २२७ जागा लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे ‘मनसे’ने भाजपचे मनसुबे उधळून लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. दरम्यान, मनसेने स्वबळाचा नारा दिला असला तरी निवडणुकीत शिंदे गट व भाजपचा मनसेशी छुपा समझोता केला जाईल, अशी शक्यता वर्तवली जाते आहे.

एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार सोबत घेऊन शिवसेनेशी बंडखोरी केली. शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात सत्तांतर झाले आणि शिंदे गट आणि भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर भाजप नेत्यांचा विश्वास वाढला असून मुंबई महापालिका काबीज करणे भाजपचे लक्ष आहे. त्यासाठी भाजप नेत्यांकडून रणनीती आखली जात आहे. शिंदे गट सोबत आल्यानंतर मनसेला सोबत घेत शिवसेनेचे अस्तित्व मिटवण्यासाठी भाजपने मनसेला सोबत घेणार असल्याचे संकेत दिले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यामुळे मनसे मुंबई महापालिकेत भाजपचे कमळ फुलवणार, असे वाटत असतानाच मनसेने २२७ जागांवर उमेदवार उभे करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे मनसेची ही खेळी कुठल्या राजकीय पक्षांसाठी फायद्याचे ठरेल, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईलच; मात्र मनसेची २२७ जागांवर उमेदवारी उभी करण्याची घोषणा या मागे भाजपचा हात असल्याचे बोलले जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in