भाजपला मनसेची साथ! लोकसभेच्या २ जागा मिळणार, राज्यसभेचा पर्याय देण्याचाही प्रस्ताव?

भाजपने लोकसभेची जोरदार तयारी केली असून, मुंबईत कोणत्याही परिस्थितीत सर्वच जागांवर निवडणूक जिंकण्यासाठी योजना आखण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी मनसेलाही सोबत घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
भाजपला मनसेची साथ! लोकसभेच्या २ जागा मिळणार, राज्यसभेचा पर्याय देण्याचाही प्रस्ताव?

विशेष प्रतिनिधी/मुंबई

भाजपने लोकसभेची जोरदार तयारी केली असून, मुंबईत कोणत्याही परिस्थितीत सर्वच जागांवर निवडणूक जिंकण्यासाठी योजना आखण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी मनसेलाही सोबत घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यासाठी भाजप आणि शिवसेनेने मनसेला एक-एक जागा सोडण्याची तयारी दर्शविली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मनसेला दोन्ही जागा मुंबईत सोडणार की, मुंबईसह राज्यातही सोडली जाणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु महायुतीत मनसेचीही साथ मिळविण्याच्या प्रयत्नाला वेग आला आहे. त्यामुळे मुंबईत २ जागांचे उमेदवार वगळता इतर ४ जागांवरील उमेदवार घोषित केलेले नाहीत. यामागे भाजपचा मोठा डाव असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, भाजप-शिवसेनेने मनसेला सोबत घेण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या असल्या तरी मनसेने अद्याप महायुतीचा प्रस्ताव स्वीकारला नसल्याचे बोलले जात आहे. मुळात मनसेने दोन दिवसांत आपली भूमिका जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे भाजप-शिवसेनेचा प्रस्ताव स्वीकारणार की, लोकसभा निवडणुकीत तटस्थ भूमिका घेणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

दक्षिण मुंबईचा पर्याय?

मनसेसाठी खास दक्षिण मुंबईचा पर्याय देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यासंबंधीचा प्रस्तावही दिला असल्याचे समजते. परंतु महायुतीच्या चिन्हावर निवडणूक लढण्याची अट समोर ठेवल्याचे समजते. दक्षिण मुंबईत ठाकरे गटाचे अरविंद सावंत विद्यमान खासदार आहेत. त्यांच्या विरोधात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे ते कामाला लागले आहेत. त्यामुळे आता या जागेवर मनसे मैदानात उतरणार का, नार्वेकरांनाच उमेदवारी मिळणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. मात्र, मनसेने हा प्रस्ताव स्वीकारल्यास ठाकरे गटासमोर मुंबईत मोठे आव्हान उभे राहू शकते, असे बोलले जात आहे.

महायुतीच्या चिन्हावर निवडणूक लढवावी

मनसेला महायुतीच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव देण्यात आल्याचे समजते. त्याबाबतची चर्चाही रंगली आहे. परंतु अगोदरच शिवसेनेने मुंबईतील ५ जागा भाजपला देऊन एकच जागेवर निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव मान्य केल्याचे सांगितले जात असताना शिवसेना आता मनसेला नेमकी कुठली जागा देणार, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

राज्यसभेचा पर्याय देण्याचाही प्रस्ताव?

भाजप, शिवसेना आणि मनसे यांच्यात मागच्या अनेक दिवसांपासून चर्चेचे सत्र सुरू आहे. बऱ्याचदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जाऊन भेट घेत बंद दाराआड चर्चाही केली आहे. मात्र, अद्याप यांच्यात एकमत झालेले नाही. परंतु आता कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. त्यामुळे आता युतीच्या हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, लोकसभा निवडणूक न लढल्यास राज्यसभेचा पर्यायही देण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याचे समजते. मात्र, अद्याप मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी तयारी दर्शविलेली नाही. मुळात महायुतीच्या चिन्हावर निवडणूक लढण्याची मनसेची तयारी नाही. त्यामुळे महायुतीत सामील होण्याचे घोडे अडले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in