मुंबई : सिनेट निवडणुकीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनादेखील आक्रमक झाली आहे. निवडणूक तातडीने घ्या, अशी मागणी करत मनसेने सोमवारी विद्यापीठात ठिय्या आंदोलन केले. तसेच मुबई विद्यापीठाच्या कुलगुरुंना विदूषकची प्रतिमा भेट दिली.
मुंबई विद्यापीठाने राज्य शासनाच्या निर्देशानुसार नोंदणीकृत पदवीधर गटाच्या सिनेट (अधिसभा) निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम स्थगित केला. मात्र १८ ऑगस्ट रोजी विद्यापीठाने कुठलीही पूर्वकल्पना न देता रातोरात निवडणुकीला स्थगिती दिल्याचे परिपत्रक काढले. अखेर हे प्रकरण हायकोर्टात पोहोचल्यानंतर आता नवीन वेळापत्रकानुसार सिनेट निवडणुका एप्रिलमध्ये होणार आहेत.
एप्रिलमध्ये होणाऱ्या सिनेटच्या निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचा ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला आहे. विद्यापीठाची सिनेट निवडणूक एप्रिलऐवजी तातडीने डिसेंबर अखेरपर्यंत घ्यावी, अशी मागणी केली जात आहे. दुसऱ्या बाजूला विधीज्ञ सागर देवरे यांनी याप्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. देवरे यांनी याचिकेत मागणी केली आहे की, मुंबई हायकोर्टाने मुंबई विद्यापीठाला सिनेट निवडणुका घेण्याबाबत निर्देश द्यावे. ३० नोव्हेंबरपूर्वी या निवडणुका घेण्याचे निर्देश देण्याची मागणी देवरे यांनी याचिकेद्वारे केली आहे.
यासंदर्भात मनसेने ‘एक्स’ (ट्विटर) वर म्हटले की, “सिनेट निवडणुकीसंदर्भात चालू असणाऱ्या अनागोंदी कारभाराबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आक्रमक होत सोमवारी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंना जाब विचारला. प्रश्नांची उत्तरे न देता मुद्द्यांना बगल देणारी कुलगुरूंची मखलाशी ऐकून मनविसे पदाधिकारी आक्रमक झाले. हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य ज्या व्यवस्थेच्या हातात आहे, तीच व्यवस्था विदूषकी चाळे करू लागली तर काय करावे? म्हणून सरचिटणीस गजानन काळे, अखिल चित्रे, प्रमुख संघटक यश सरदेसाई, चेतन पेडणेकर, सुधाकर तांबोळी, संतोष गांगुर्डे आणि सहकारी पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत कुलगुरूंना विदूषकाची प्रतिमा भेट दिली.”