Raj Thackeray : राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसह शिंदे-फडणवीसांनाही दिले सल्ले; शिवतीर्थावर काय म्हणाले?

आज शिवाजी पार्कवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) उद्धव ठाकरे तसेच शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली, मशिदीच्या भोंग्यांवरून दिला इशारा
Raj Thackeray : राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसह शिंदे-फडणवीसांनाही दिले सल्ले; शिवतीर्थावर काय म्हणाले?

आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी जाहीर सभा घेतली. याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष होते. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य तर केलेच, शिवाय मशिदींच्या भोंग्यांवरही शिंदे - फडणवीस सरकारला इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी माहीमच्या समुद्र किनाऱ्यावर अनधिकृत होत असलेल्या दर्ग्याकडेही लक्ष खेचले. यावेळी त्यांनी राज्य सरकारला आणि प्रशासनाला इशारा दिला की, "जर ही समुद्रातील दर्गा हटवली नाही, तर त्याच्या बाजूलाच गणपतीचे मंदिर बांधू"

मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, "मशिदीवरील भोंग्यांचा विषय मी सोडलेला नाही. शिंदे-फडणवीस सरकारने एक तर स्वत: पुढाकार घेउन हे भोंगे बंद करावेत,नाहीतर आम्ही बंद करू, आमच्याकडे दुर्लक्ष करा. या दोन पैकी एक निर्णय हा सरकारला घ्यावाच लागेल." असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच, "मुंबईतील माहिमच्या समुद्रात गेल्या २ वर्षांत एक नवीन अनधिकृत दर्गा उभारण्यात येत आहे. नवीन हाजी अली करण्याचा प्रकार आहे. या महिन्याभरात कारवाई करून जर हे बांधकाम तोडले नाही, तर त्याच्या बाजूला सगळयात मोठे गणपतीचे मंदिर आम्ही उभारू," असेही ते म्हणाले आहेत.

"राज्यातील राजकारणाने तळ गाठला आहे. राज्य सरकारचे भवितव्य न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता,आताच विधानसभेच्या निवडणूका लावा. जो काही सोक्षमोक्ष हवा, तो होउन जाऊदेत. राजकारणाचा जो काही चिखल केला आहे, तोच नागरिकांनी परत तुमच्या तोंडात नाही टाकला तर बघा," असे आव्हानही राज ठाकरेंनी यावेळी दिले. तसेच, "शिवसेना हा पक्ष लहानपणापासून मी जगलो आहे. तोच आज टांगला गेलेला पाहून मनाला त्रास होतो आहे," असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवरदेखील टीका केली.

"महाविकास आघाडी सरकारच्या काळात १७ हजार मनसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ते मागे घ्यावेत. मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार आहोत." असेदेखील ते म्हणाले. तसेच, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सल्लादेखील दिला. ते म्हणाले की, "तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहेत हे लक्षात असुद्या. उद्धव ठाकरे जिथे सभा घेतात, त्यांच्या मागून हेही तिकडेच सभा घेतात. ते तुम्हाला गुंतवून ठेवतील. आज सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा प्रश्न आहे, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, आधी ते मिटवा." असे राज ठाकरे म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in