'...तर रस्त्यावर पवार पवार ओरडत फिरण्याची येईल वेळ'; मनसेचा राऊतांना सल्ला

'पटलं तर घ्या' म्हणत मनसेचे (MNS) नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पत्र लिहीत दिला हा सल्ला
'...तर रस्त्यावर पवार पवार ओरडत फिरण्याची येईल वेळ'; मनसेचा राऊतांना सल्ला

अनेकदा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे पत्रकार परिषदेत वापरल्या जाणाऱ्या त्यांच्या भाषेमुळे अडचणीत सापडले आहेत. शिंदे गट आणि भाजपवर टीका करताना अनेकदा त्यांची जीभ घसरली आहे. अशामध्ये आता मनसेचे (MNS) नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनीदेखील याबाबत एक पत्र लिहून संजय राऊतांना एक सल्ला दिला आहे. या पत्रामध्ये संदीप देशपांडे म्हणतात की, "राऊतांनी पत्रकार परिषदेपूर्वी योगा करावा" असा सल्ला दिला आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रात लिहिले आहे की, "तुमच्याबद्दल वाटणाऱ्या काळजीपोटी हे पत्र लिहिले आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपल्या भाषेचा दर्जा खालावला आहे. आपली चीडचीड होताना दिसत असून बिनबुडाचे आरोपदेखील करत आहात. आपल्या मनाविरुद्ध घटना घडू लागल्या की माणसाचा संयम ढासळू लागतो. त्याची चीडचीड होऊ लागते. कधी कधी तर नैराश्याचे झटकेही येतात. तुम्ही कितीही नाकारले तरी ही सगळी लक्षणे तुमच्यात दिसायला लागली आहेत. आता हे सगळं हाताबाहेर जाण्याआधीच काळजी घेणे गरजेचे आहे." असे त्यांनी यावेळी म्हंटले आहे.

संदीप देशपांडे पुढे म्हणाले की, "तुम्ही रोज जी पत्रकार परिषद घेता, त्यापेक्षा २ दिवसातून एकदा घ्या, मग हळू हळू आठवड्यातून एकदा घ्या, असे करता येईल का? हे जरूर पाहा आणि ते शक्य नसल्यास पत्रकार परिषेदच्या १० ते १५ मिनिटे पूर्वी योगा करा. त्यामुळे तुम्हाला थोडे बरे वाटेल." असा टोला लगावला. "आपणच सगळ्यांना पवार साहेबांच्या नादी लावले आणि म्हणूनच शिवसेना हातून गेली, ही सल मनाला लावून घेतली आहे. ती पहिले आपल्या मनातून काढून टाका. तुम्ही काही एकटेच या ऱ्हासाला जबाबदार नाहीत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेही तेवढेच जबाबदार आहेत, हे लक्षात घ्या. नाहीतर काही दिवसांनी रस्त्यावर ‘पवार…पवार’ ओरडत दगड भिरकवत फिरायची वेळ आपल्यावर येईल," असा सल्ला संदीप देशपांडेंनी संजय राऊतांना या पत्रातून दिला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in