पाच कोटींच्या खंडणीची मागणी; अविनाश जाधवांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

ज्वेलर्स ‍व्यापाऱ्याच्या मुलाला मारहाण करून पाच कोटींच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी मनसेचे ठाणे-पालघर विभागाचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल...
अविनाश जाधव यांचे संग्रहित छायाचित्र
अविनाश जाधव यांचे संग्रहित छायाचित्र सौ - फेसबुक

मुंबई : ज्वेलर्स ‍व्यापाऱ्याच्या मुलाला मारहाण करून पाच कोटींच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी मनसेचे ठाणे-पालघर विभागाचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह तिघांविरुद्ध एल. टी. मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आर्थिक वादातून हा प्रकार घडल्याचे बोलले जाते. गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. चौकशीनंतर दोषी व्यक्तीविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

शैलेश जैन हे ज्वेलर्स व्यापारी असून, त्यांचा झव्हेरी बाजार येथे सोन्याचे दागिने विक्रीचा व्यवसाय आहे. वैभव ठक्कर हा त्यांचा परिचित असून, त्यांच्यात आर्थिक वाद सुरू आहे. बुधवारी शैलेश जैन याने वैभवला आर्थिक तडजोडीसाठी बोलाविले होते. यावेळी त्यांच्यात वाद झाल्याने त्याने अविनाश जाधव यांना ही माहिती दिली होती. त्यानंतर अविनाश जाधव हे त्यांच्या अंगरक्षक, चालक आणि इतर पाच ते सहा कार्यकर्त्यांसोबत तिथे आले होते. शाब्दिक वादानंतर त्यांनी शैलेश जैन यांचा मुलगा स्वामिल जैन याला मारहण करून धमकी दिली होती. त्यानंतर अविनाश जाधव यांनी त्यांच्याकडे पाच कोटीच्या खंडणीची मागणी केली होती. या घटनेनंतर त्यांनी अविनाश जाधव, वैभव ठक्करसह अन्य एका व्यक्तीविरुद्ध एल. टी. मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर अविनाशसह तिघांविरुद्ध पोलिसांनी खंडणीसह मारहाण करणे आणि कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. खंडणीची मागणी केल्याच्या वृत्ताला अविनाश जाधव यांनी नकार दिला. वैभवच्या सांगण्यावरून आपण तिथे गेलो होतो. काही वेळाने त्यांनी पोलिसांना कॉल करून तिथे बोलावून घेतले होते; मात्र त्यांच्यात वाद झाल्याने त्यांनी आपल्याला कॉल केल्याचे अविनाश जाधव यांनी पोलिसांना सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in