मुंबई : देवनार पशुवध केंद्रातून बकरी ईदच्या दिवशी व्यापाऱ्याकडील कॅश आणि मोबाईल चोरी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात देवनार पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी एका मुख्य आरोपीसह त्याच्या चार सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. साबीर सिराज सय्यद, दस्तगीर ऊर्फ फिरोज साबीरहसन शेख, सलाम नईम खान, अब्दुल्ला मोहम्मद आरिफ शेख आणि नासीर नईम खान अशी या पाचजणांची नावे आहेत. या आरोपींकडून चोरीचे सोळा मोबाईलसह कॅश पोलिसांनी जप्त केली आहे. अटकेनंतर या पाचही आरोपींना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. २५ जूनला बकरी ईद असल्याने देवनार पशुवध केंद्रात व्यापार्यांची बकरा खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा घेऊन काही चोरट्यांनी व्यापाऱ्यांकडील कॅश आणि मोबाईल चोरी केले होते. याबाबत काही तक्रारी देवनार पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरू केला होता. ही शोधमोहीम सुरू असतानाच पाच संशयितांना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले होते.