समुद्र किनारी फिरती स्वच्छतागृहे ;आठ चौपाट्यांवर मोबाईल टॉयलेट

मुंबईला लाभलेल्या समुद्र किनार्‍यावरील गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जुहू चौपाटी, अक्सा बीच, वर्सोवा व गोराई या चौपाट्यांवर दररोज हजारो पर्यटक भेट देत असतात
समुद्र किनारी फिरती स्वच्छतागृहे ;आठ चौपाट्यांवर मोबाईल टॉयलेट
PM

मुंबई : समुद्रकिनारी चौपाट्यांवर येणाऱ्या पर्यटकांसाठी सोयीसुविधांसह फिरती स्वच्छतागृहे बांधण्यात येणार आहे. या मोबाईल टॉयलेटच्या माध्यमातून दिव्यांग, वृद्धांसाठी लोव्हर प्लॅटफार्मची सुविधा उपलब्ध करून करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली. दरम्यान, या उपक्रमात आठ चौपाट्यांवर एकूण २४ मोबाईल टॉयलेट उभारण्यात येणार असून, सोलर पॅनलही बसवण्यात येणार आहेत. यासाठी मुंबई महापालिका तब्बल ३ कोटी ४२ लाख रुपये खर्च करणार आहे. दरम्यान, समुद्र किनारपट्टी परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी मोहिमेंतर्गत आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्देशानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाने ही प्रक्रिया सुरू केली आहे.

मुंबईला लाभलेल्या समुद्र किनार्‍यावरील गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जुहू चौपाटी, अक्सा बीच, वर्सोवा व गोराई या चौपाट्यांवर दररोज हजारो पर्यटक भेट देत असतात. समुद्र किनारी चौपाट्यांवर येणार्‍या पर्यटकांची शौचालय अभावी मोठी गैरसोय होते. यामुळे समुद्र किनार्‍यावर अस्वच्छता, दुर्गंधी निर्माण होते. त्यामुळे चौपाट्यांवर अद्ययावत सुविधा असणारे मोबाईल टॉयलेट उभारण्याचा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. ही स्वच्छतागृहं उभारणीसाठी महाराष्ट्र सागरी मंडळ (महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड) यांचे ना हरकत प्रमाणपत्रही उपलब्ध झाले आहे. त्यानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्वच्छतागृह बांधणीची कामे हाती घेतली आहेत. यामध्ये गिरगाव चौपाटी - २, दादर आणि माहीम ८, जुहू ६, वर्सोवा ४, वर्सोवा १), मढ – मार्वे १, मनोरी – गोराई २ अशी स्वच्छतागृहे उभारली जाणार आहेत. या स्वच्छतागृहांच्या संचलन आणि देखभालीची जबाबदारी ही कंत्राटदाराची असेल. प्रत्येक दिवशी पाच वेळा या प्रसाधनगृहांची स्वच्छता करण्यात येईल. त्यासाठी तीन पाळ्यांमध्ये कर्मचारी वर्गाची नेमणूक करण्यात आली आहे.

महिला, पुरूष आणि दिव्यांगांसाठी सुविधा

- स्वच्छतागृहांच्या ठिकाणी विजेची सुविधा म्हणून सौरऊर्जेचा वापर करण्याचे प्रामुख्याने सुचवण्यात आले आहे. समुद्र किनार्‍यावर उपलब्ध करुन दिल्या जाणार्‍या प्रत्येक स्वच्छतागृहात महिला (३), पुरूष (३) आणि दिव्यांग व्यक्तिसाठी (१) याप्रमाणे ७ शौचकुपांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. दिव्यांग व्यक्तिंसाठी ‘लो फ्लोअर’ स्वच्छतागृहांची सुविधा पुरवण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे  यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in