पाणीसाठा घटला, चिंता वाढली! मोडकसागर धरणातील साठा प्रथमच ७० टक्क्यांवर; स्विमिंग पूल, मनोरंजन क्लबचे पाणी होणार बंद

दुष्काळाच्या झळा आता सर्वसामान्यांना बसू लागल्या असून मुंबईकरांनाही त्याचे चटके जाणवायला सुरुवात झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोडकसागर धरणातील पाणीसाठा ऑक्टोबर महिन्यातच ७० टक्क्यांवर आल्याने मुंबईकरांपुढील चिंतेत आणखी भर पडली आहे.
पाणीसाठा घटला, चिंता वाढली! मोडकसागर धरणातील साठा प्रथमच ७० टक्क्यांवर; स्विमिंग पूल, मनोरंजन क्लबचे पाणी होणार बंद
Published on: 

मुंबई : दुष्काळाच्या झळा आता सर्वसामान्यांना बसू लागल्या असून मुंबईकरांनाही त्याचे चटके जाणवायला सुरुवात झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोडकसागर धरणातील पाणीसाठा ऑक्टोबर महिन्यातच ७० टक्क्यांवर आल्याने मुंबईकरांपुढील चिंतेत आणखी भर पडली आहे. पुढील वर्षाचे नियोजन लक्षात घेता, आता जलतरण तलाव किंवा मनोरंजन क्लबसाठी पाणीपुरवठा बंद करण्याचे संकेत मिळत आहेत.

ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाने पाठ फिरवल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये १०० टक्के पाणीसाठी जमा होऊ शकलेला नाही. आता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांत ७ ऑक्टोबर रोजी ९४.५७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र हा पाणीसाठा मे २०२७ पर्यंत मुंबईकरांची तहान भागवेल इतकाच आहे. एल निनोचा प्रभाव लक्षात घेता, पुढील वर्षी किती पाऊस बरसेल, याची शाश्वती नसल्यामुळे १० टक्के पाणीकपात मागे घेण्याबाबत राज्य सरकारबरोबर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे महापौर रितू तावडे यांनी सांगितले. दरम्यान, मुंबईत दुष्काळाची परिस्थिती नसली तरी पाणी जपून वापरण्याचे आवाहनही महापौरांनी मुंबईकरांना केले आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणापैकी मोडक सागर, तानसा धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेण्यासाठी पाहणी दौरा आयोजित केला होता. यावेळी सभागृह नेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, काँग्रेसचे गटनेते अशरफ आजमी, एमआयएमचे गटनेते केवश उबाळे, शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर, स्थायी समिती सदस्य जमिर कुरेशी, श्रद्धा जाधव, टुलिप मिरांडा, मनीषा पाटणकर आदी उपस्थित होते.

पाणीगळती रोखण्यासाठी प्रयत्न सुरु

धरणांमध्ये सुमारे ९५ टक्के पाणीसाठा असला तरी बाष्पीभवनामुळे प्रत्यक्षात उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते, याकडे स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी लक्ष वेधले. त्यामुळे पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त अन्य वापरावर नियंत्रण आणण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईतील सुमारे ३४ टक्के पाणीगळती रोखण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र, गळती नेमकी कुठे आणि किती प्रमाणात आहे, याचा शोध घेण्याची आवश्यकता असल्याचे सभागृह नेते गणेश खणकर यांनी नमूद केले.

पाण्याच्या वापरावरही ठेवणार नियंत्रण

मुंबईत सध्या सुमारे २,२०० बांधकामे सुरू असून या बांधकामांसह व्यावसायिक वापरासाठी होणाऱ्या पाण्याच्या वापरावरही नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. मुंबईकरांना पाणी उपलब्ध करून देणे हा प्राधान्यक्रम असला पाहिजे, असे महापौरांनी सांगितले.

एल निनोचा प्रभाव राहिल्यास स्थिती गंभीर

मुंबईला सध्या दुष्काळग्रस्त परिस्थिती नसली तरी महाराष्ट्रातील काही भागात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाण्याच्या गरजेचाही विचार करावा लागणार आहे. सध्या पाणीसाठा समाधानकारक दिसत असला तरी २०२७ च्या फेब्रुवारीपर्यंत परिस्थिती काय असेल, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यातच एल निनोचा प्रभाव राहिल्यास पाणीटंचाईची परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in