

मुंबई : दिवसेंदिवस तापमानाचा चढणारा पारा, त्यामुळे होणारे बाष्पीभवन यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठ्यात घट होत असून दररोज २५० दशलक्ष लिटर पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. मोडक सागर धरणातील पाणीसाठा ७ ऑक्टोबर रोजी ९० हजार ७१४ दशलक्ष लिटर होता. मात्र १९ ऑक्टोबर रोजी मोडक सागर धरणातील पाणीसाठा ६७ हजार ११४ दशलक्ष लिटर खाली आल्याने १२ दिवसांत मोडक सागर धरणातील पाणीसाठा अर्ध्यावर आला आहे. यंदा १९ ऑक्टोबर रोजी सातही धरणांत ९०.०५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. कडक उन्हाळा, एल-निनोच्या प्रभावामुळे मुंबईतील पिण्याच्या पाण्याचे संकट गडद झाले आहे.
यंदा राज्यात समाधानकारक पाऊस बरसला नाही. त्यामुळे अनेक जिल्ह्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मुंबईत दुष्काळाची स्थिती नसली फेब्रुवारी २०२७ पर्यंत अल् निनोचा प्रभाव असणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांत पाणीसाठा उपलब्ध असला तरी पुढील पावसाळ्यात कधी व किती पाऊस बरसेल याची शाश्वती नाही.
अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ४,१०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागविण्यासाठी सातही धरणातील पाणीसाठा १४ लाख ४३ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी असणे गरजेचे आहे. सध्या १९ ऑक्टोबर रोजी सातही धरणात ९०.०५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र उन्हाचा तडाखा वाढते तापमान त्यात बाष्पीभवन यामुळे धरणातील पाणीसाठ्यात दररोज २५० मिलियन लिटर पाणी हवेत विरते. त्यामुळे धरणात पाणीसाठा उपलब्ध असला तरी पाणी जपून वापरा, असे आवाहन पालिकेच्या जल विभागाने केले आहे.
१९ ऑक्टोबर रोजी धरणातील पाणीसाठा (दशलक्ष लिटर) अप्पर वैतरणा - २,१५,४७६, मोडक सागर - ६७,११४, तानसा - १,२६,८४०, मध्य वैतरणा - १,९३,५४५, भातसा - ६,६६, ००६, विहार - २६,९४९, तुळशी - ७,४८८. सात धरणातील पाणीसाठा (टक्केवारीत)२०२६ - ९०.०५, २०२५ - ९६.२९, २०२४ - ९७.०३.