कचरा संकलन केंद्रांचे आधुनिकीकरण; विभागवार केंद्र उभारण्याचा BMC चा निर्णय

मुंबईत झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येच्या तुलनेत कचऱ्याच्या समस्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. परिणामी डंपिंग ग्राऊंडच्या जागेची अडचण निर्माण झाली आहे.
कचरा संकलन केंद्रांचे आधुनिकीकरण; विभागवार केंद्र उभारण्याचा BMC चा निर्णय
Published on

मुंबई : मुंबईत झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येच्या तुलनेत कचऱ्याच्या समस्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. परिणामी डंपिंग ग्राऊंडच्या जागेची अडचण निर्माण झाली आहे. यासाठी पालिकेने हजारो टन कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी सर्व विभागात कचरा संकलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कचऱ्याची समस्या काही काळासाठी तरी दूर होईल, असा विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

मुंबई शहराचा कचरा ज्या दोन डंपिंग ग्राऊंडवर टाकण्यात येतो त्यापैकी देवनार डम्पिंग ग्राऊंड हे काही दिवसाने पूर्ण भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईतील कचऱ्याचा भार कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडवर पडला आहे. कांजूरमार्ग येथील डम्पिंग ग्राउंडची क्षमताही आता संपुष्टात येत आहे. लवकरच हे डम्पिंग ग्राउंड देखील पूर्ण क्षमतेने भरणार आहे. पालिकेने मुंबईत कचरा संकलन केंद्रांच्या माध्यमातून सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण केल्याने डम्पिंग ग्राऊंडवरील भार काहीसा कमी झाला होता. आता या कचरा संकलन केंद्रांचे आधुनिकीकरण करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. यामुळे रोजगार निर्मिती देखील होणार असल्याचं पालिकेचं म्हणणं आहे.

मुंबईत सध्या २४ विभागात ४६ कचरा संकलन केंद्र आहेत.

असा होणार आधुनिकीकरणाचा फायदा

सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे अधिक सुलभ होणार आहे. या संकलन केंद्रांवर सुका कचरा एकत्र आणला जातो. एका कन्वेयर बेल्टवर हा कचरा टाकून कचरा वेचक महिला या कचऱ्याचे वर्गीकरण करतात. यातील विक्री होणाऱ्या वस्तू विक्रीसाठी पाठवल्या जातात. तर, ज्या वस्तूंवर पुनर्प्रक्रिया करणे शक्य आहे त्या रिसायकलिंगसाठी पाठवल्या जातात. उरलेला अनावश्यक भाग हा डंपिंग ग्राउंडवर पाठवला जातो. या संकलन केंद्रांमुळे रोजगार निर्मिती झाली असून, त्याचे आधुनिकीकरणानंतर या प्रक्रियेला अधिक वेग येईल, असा दावा पालिकेने केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in