
मुंबई : आशय, सर्जनशीलता आणि संस्कृती हे तीन स्तंभ असणाऱ्या केशरी अर्थव्यवस्थेची देशात पहाट झाली असून भारत सध्या चित्रपट निर्मिती, डिजिटल कंटेंट, गेमिंग, फॅशन, संगीत आणि लाइव्ह कॉन्सर्ट्स यासाठी एक जागतिक केंद्र म्हणून उदयास येत आहे. जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद (वेव्हज) ही जागतिक मंचावर भारताचे सर्जनशील सामर्थ्य अधोरेखित करत असून आगामी काळात भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेचा ‘जीडीपी’मध्ये (सकल देशांतर्गत उत्पन्न) मोठा वाटा असेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेचे (वेव्हज) मोदी यांच्या हस्ते शानदार उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र दिन आणि गुजरात राज्य स्थापना दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
‘मुलाच्या जीवनप्रवासाची सुरुवात आईच्या ज्या अंगाईने होते तो ध्वनी आणि संगीताशी झालेला त्यांचा पहिला परिचय असतो. असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले, की ज्याप्रमाणे आई मुलांसाठी स्वप्नांचे धागे विणते तशाच पद्धतीने सर्जनशील व्यावसायिक एका नव्या युगाच्या स्वप्नांना आकार देतात.
भारतीय संगीताचे आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले, भजन असो, गझल असो, शास्त्रीय रचना असो किंवा समकालीन सूर असो, प्रत्येक गीतामध्ये एक कथा असते आणि प्रत्येक लयीत एक आत्मा असतो. नाद ब्रह्म या दैवी ध्वनीची संकल्पना अधोरेखित करतात. भारतीय पौराणिक कथा नेहमीच संगीत आणि नृत्याद्वारे दैवी भाव व्यक्त करतात. भगवान शिवाचे डमरू हा पहिला वैश्विक ध्वनी, देवी सरस्वतीची वीणा ही ज्ञानाची लय, भगवान कृष्णाची बासरी ही प्रेमाचा शाश्वत संदेश, तर भगवान विष्णूचा शंख हे सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे.
गुरुदत्त यांच्या चित्रपटांमधील काव्य, ऋत्विक घटक यांच्या चित्रपटात उमटणारे सामाजिक चित्र, ए. आर. रहमान यांची सांगितिक प्रतिभा आणि एस. एस. राजामौली यांची कथा मांडण्याची विलक्षण धाटणी, यांचा उल्लेख करत या कलाकारांनी भारतीय संस्कृती जगभरातील लक्षावधी लोकांच्या आयुष्यात नेल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
जगातील अॅनिमेशन मार्केट ४३० अब्ज डॉलरहून अधिक असून पुढील १० वर्षांत ते दुप्पट होणार असल्याचे मानले जाते. या वेव्हज परिषदेत जागतिक प्रतिभा व सर्जनशीलतेच्या जागतिक इकोसिस्टीमचा पाया रचला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की, भारतीय चित्रपट आता जगभरात सर्वदूर पोहोचले आहेत. आज १०० पेक्षा अधिक देशांमध्ये भारतीय चित्रपट प्रदर्शित होतात. परदेशातील प्रेक्षक भारतीय चित्रपट केवळ बघत नाहीत, तर त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. अनेक विदेशी प्रेक्षक आता सबटायटल्ससह भारतीय कंटेंट पाहतात हे भारतीय सिनेमाचे वैशिष्ट्य आहे. भारत आज फिल्म प्रॉडक्शन, डिजिटल कंटेंट, गेमिंग, फॅशन आणि म्युझिक यांचे जागतिक केंद्र बनले आहे. आपल्याला माणसाला यंत्र बनू द्यायचे नाही, तर त्याला अधिक समृद्ध आणि संवेदनशील बनवायचे आहे. माणसाची प्रगती केवळ माहिती, तंत्रज्ञान किंवा वेगाच्या जोरावर मोजता येणार नाही, तर त्यासाठी संगीत, कला, नृत्य यांना सुद्धा महत्त्व द्यावे लागेल.
अभिनेते अनुपम खेर यांनी प्रस्तावनेद्वार वेव्हज आयोजनाचा उद्देश सांगितला. एम. एम. किरवाणी, श्रेया घोषाल, मांगली यांनी स्वागत गीत सादर केले. तर, वेव्हज सल्लागार मंडळाचे सदस्य मोहनलाल, हेमामालिनी, कार्तिक आर्यन, एस. एस. राजामौली, रजनीकांत, अनिल कपूर, भूमी पेडणेकर, रणबीर कपूर, आमिर खान, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी, ॲडोबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनु नारायण आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
यावेळी गुरुदत्त, श्रीमती पी. भानुमती, राज खोसला, ऋत्विक घटक, सलील चौधरी यांच्या भारतीय सिनेमामधील योगदानाच्या स्मरणार्थ टपाल तिकिटाचे अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर, माहिती प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह देशविदेशातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
१२० एकरमध्ये उभारणार माध्यम व करमणूक शहर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ५०० एकर क्षेत्रफळ असलेली मुंबईतील चित्रपट नगरी आता पुढील पिढीच्या स्टुडिओ इकोसिस्टमसाठी जागतिक केंद्र म्हणून विकसित केली जात आहे. यातील १२० एकरमध्ये माध्यम व करमणूक शहर उभारण्यात येऊन यात ॲॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि गेमिंगवर लक्ष केंद्रित करणार आहे.
मुंबईत साकारणार आयआयसीटी
भारतात पहिल्यांदाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी मुंबईत स्थापन होणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने ४०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. या संस्थेच्या स्थापनेसाठी गुगल, ॲपल, मायक्रोसॉफ्ट आणि ॲडोबीसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे सहकार्य लाभणार आहे. वेव्हज या व्यासपीठाच्या माध्यमातून भारत सर्जनशील उद्योगजगताच्या जागतिक केंद्रस्थानाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे रेल्वे आणि माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वागतपर भाषणात सांगितले.