

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) कोणाच्याही विरोधात नाही, संघ देशासाठी काम करतो, संघाचे कार्य अद्वितीय आहे आणि ते जगभरातील लोकांना आकर्षित करीत आहे, असे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले. संघाला लोकप्रियता नको आहे. संघाला सत्ता किंवा ताकदही नको आहे. देशाच्या भल्यासाठी जेवढी कामे होत आहेत ती सर्व कामे व्यवस्थित व्हावीत यासाठी संघ काम करतो. संघात व्यवहार होत नाहीत. आपुलकीच्या भावनेने संघात सगळे काम होते, असेही भागवत यांनी सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० वर्षे नवे क्षितिज या कार्यक्रमात डॉ. भागवत बोलत होते.
यावेळी सरसंघचालकांनी काँग्रेसच्या स्थापनेचा उल्लेख केला. संघ प्रमुख म्हणाले की, इंग्रजांनी काँग्रेसची स्थापना सुरक्षा वॉल्वच्या रुपात केली होती. भारतीयांनी यास स्वातंत्र्य संग्रामाच्या एका शक्तीशाली साधनात बदलले. संघाचे काम अनोखे आहे, आमच्या माहितीनुसार आम्ही म्हणतो की, असे काम जगात कुठेही होत नाही. आता आम्ही याचा थेट अनुभव घेत आहोत. कारण भारत आणि परदेशातून लोक संघाला पाहण्यासाठी येतात. पाच महाखंडांतून लोक येतात, संघाच्या कार्यक्रम आणि कामाचा अभ्यास करत असतात अनेक प्रश्न विचारत असतात असेही ते म्हणाले.
संघाचे कार्य राष्ट्रासाठी; कोणाशीही स्पर्धा नाही
संघ भारतीय परंपरेवर आधारित संगीत वाजवतो आणि वैयक्तिक गाणीही गातो. पुन्हा एकदा, शंभर वर्षांनंतर, आम्ही तुम्हाला संघ काय आहे ते सांगत आहोत. संघाचे कार्य स्वतःसाठी नाही तर संपूर्ण राष्ट्रासाठी आहे असेही भागवत यांनी सांगितले. संघाची स्थापना कोणाशीही स्पर्धा करण्यासाठी झाली नाही. संघाची स्थापना इतर कोणत्याही संघटनेशी स्पर्धेत झाली नाही, किंवा तो कोणत्याही विशिष्ट परिस्थितीला प्रतिसाद म्हणून निर्माण झालेला नाही आणि संघ कोणाच्याही विरोधात वागला नाही. आमचे काम कोणाचाही विरोध न करता केले जाते.
भारताचा सनातन स्वभाव
मोहन भागवत यांनी पुढे बोलताना हिंदू धर्मावरही भाष्य केले. भारताचा सनातन स्वभाव कधीच बदलणार नाही. ऋषी-मुनींनी सांगितलेले आहे की सगळे आपलेच आहेत. आपल्याला सगळ्यांच्या सोबत चालायचे आहे. आपल्याला कोणालाही मागे सोडायचे नाही. एकट्याला राहायचे असेल तर कोणत्याही नियमांची गरज नसते. जेव्हापासून सृष्टी आहे तेव्हापासून धर्म आहे, असे मत भागवत यांनी व्यक्त केले.
देशात चार प्रकारचे हिंदू
तसेच, आपण विश्वगुरू होणार आहोत. भारतातील मुस्लीम आणि ख्रिश्चन हे भारताचेच आहेत. भारतात चार प्रकारचे हिंदू आहेत. पहिला हिंदू हा अभिमानाने आपण हिंदू असल्याचे सांगतो. दुसरा हिंदू हा मी हिंदू आहे तर मग त्यात काय झाले, यात अभिमानाची बाब काय आहे, असे म्हणतो. तिसरा हिंदू हा स्वतःला हिंदू म्हणून घ्यायला तयार आहे परंतु तुम्ही मला घरात विचाराल तरच मी हिंदू असल्याचे सांगेन असे म्हणतो. चौथा हिंदू हा आपण हिंदू असल्याचेच विसरून गेला आहे. किंवा तो हिंदू असल्याचे त्याला विसरून जाण्यास भाग पाडण्यात आले आहे, असेही मत भागवत यांनी व्यक्त केले.
सलमान खानची विशेष उपस्थिती
या कार्यक्रमाला उद्योगपती राधाकृष्ण दमानी, अजय पीरामल, दीपक पारेख, सज्जन जिंदाल, नीलेश शाह, आशीष कुमार चौहान हे उपस्थित होते. त्याचप्रमाणे सिनेसृष्टीतील सलमान खान, हेमा मालिनी, रोनी स्क्रूवाला, विनीत जैन, सुभाष चंद्रा, नितेश तिवारी, मोहित सुरी, रमेश तौरानी, बोनी कपूर, अदनान सामी, ओम राऊत, विपुल शाह, प्रसाद ओक, भाऊ कदम, इंद्रकुमार आदी उपस्थित होते. त्याचप्रमाणे स्वामी स्वरूपानंद, अक्षत गुप्ता, इस्राईलचे राजकीय नेते, ब्रिटनचे राजकीय नेते, इटलीचे राजकीय नेतेही उपस्थित होते.