

मुंबई : लोकशाहीत आंदोलन हे संवादाचे एक वैध माध्यम असून त्याचा उद्देश मतभेद निर्माण करणे नव्हे, तर सर्वसंमती घडवून आणणे हा असावा, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी व्यक्त केले.
नीट पेपर फुटीप्रकरणी नुकत्याच झालेल्या तरुणाईच्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केले. मुंबईत ‘इंडियाज इंटरनॅशनल मूव्हमेंट टू युनायटेड नेशन्स’ (आयआयएमयूएन) च्या १५व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सुमारे २,००० ‘जेन झी’, ‘जेन अल्फा’ सदस्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
भारतातील शिक्षणव्यवस्थेबाबत व्यक्त केली जाणारी चिंता रास्त असल्याचे सांगत त्यांनी या क्षेत्रावरील खर्च ‘जीडीपी’च्या ६ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे समर्थन केले. “संवादातून समस्या सुटल्या नाहीत तर लोक आंदोलनाचा मार्ग स्वीकारतात, परंतु या सर्व प्रयत्नांचा हेतू सर्वसंमती निर्माण करणे हाच असावा,” असे भागवत यांनी स्पष्ट केले.
‘जेन-झी’ या नव्या पिढीच्या मागण्या आणि चिंता रास्त असून त्यांच्या प्रामाणिकपणावर आपला विश्वास आहे. जुन्या पिढ्यांच्या तुलनेत आजची तरुण पिढी प्रत्येक गोष्टीला तार्किक उत्तरे, आपुलकी आणि आदर शोधते, असेही त्यांनी नमूद केले.
सोशल मीडियावर बंदी घालणे हा उपाय नाही
“सोशल मीडियावर बंदी घालणे हा त्यावरचा उपाय नाही. बंदी घातल्यास अशा गोष्टी गुप्तमार्गाने अधिक पसरतात. समाजाने स्वतःहून स्वयंशिस्त बाळगली पाहिजे आणि ऑनलाइन मिळणाऱ्या माहितीची खात्रीशीर स्रोतांकडून पडताळणी केल्याशिवाय विश्वास ठेवू नये. कृत्रिम तंत्रज्ञानाद्वारे बनावट व्हिडिओ बनवले जाऊ शकतात, त्यामुळे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तसेच १० लाख फॉलोअर्स असलेल्या इन्फ्लुएन्सर्सने आपल्या अनुयायांची जबाबदारी भान ठेवले पाहिजे,” असे प्रतिपादन त्यांनी केले.