
मुंबई : मुंबई आणि परिसरात असलेल्या रिफायनरी मुळे हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याने गेल्या वर्षी चेंबूर येथील रिफायरीला नोटीस बजावण्यात आली होती. पुन्हा एकदा हिवाळ्यात प्रदूषणात होणारी वाढ लक्षात घेता मुंबई आणि परिसरात रिफायनरी परिसरातील हवेच्या गुणवत्तेवर वॉच ठेवला जाणार आहे. रिफायनरी परिसरातील हवेच्या गुणवत्तेची फेर पडताळणी करा, असे सक्त आदेश मुंबई महापालिका आयुक्त व प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. त्यामुळे मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने कठोर पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे.
दिल्ली पेक्षा मुंबईतील हवा खराब अशी टीका मुंबई महापालिकेवर गेल्या वर्षी व यंदाही होत आहे. हिवाळ्यात प्रदूषणात वाढ होण्याचा धोका अधिक असतो. केंद्र व राज्य सरकारने मुंबईतील वाढते प्रदूषण लक्षात घेता मुंबई महापालिकेला कठोर उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. वाढत्या प्रदूषणाला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने मुंबईतील विविध यंत्रणांची तातडीने बैठक घेत उपाययोजना करण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. मुंबई महानगर आणि परिसरात रिफायनरीच्या ठिकाणी प्रदूषण वाढते आहे.
रिफायनरी परिसरात राहणारे रहिवासी व तेथील कार्यालयांना तेथील प्रदूषणाला सामोरे जावे लागते आहे. मुंबईतील वाढत्या बांधकामांच्या ठिकाणी धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना केल्या जात नसल्याने धुळीचे प्रमाण वाढले आहे. त्यात रिफायनरीच्या ठिकाणच्या प्रदूषणाची भर पडत असण्याची शक्यता आहे. मुंबई परिसरातल्या वाढत्या प्रदूषणात उपाययोजना करण्याच्यादृष्टीने रिफायनरी परिसरातील हवेच्या गुणवत्तेशी फेर पडताळणी करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. संबंधित यंत्रणा याबाबत लवकरच रिफायनरीच्या परिसरात हवेची गुणवत्ता तपासणार करणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.