
जगभरातील १५ देशांमध्ये मंकी पॉक्सचे रुग्ण आढळले असून त्याचा संसर्ग वाढत आहे. कोरोनाचा अनुभव लक्षात घेता मंकी पॉक्स विषाणूचे संकट टाळण्यासाठी मुंबई महापालिका ‘सतर्क’ झाली आहे. विमानतळावर प्रवाशांचे स्क्रीनिंग करण्यात येणार असून संशयीत आढळल्यास कस्तुरबा रुग्णालयात २८ बेड्स तैनात ठेवण्यात आले आहेत. तसेच मुंबईतील सरकारी व खाजगी रुग्णालयांना मंकी पॉक्सचा रुग्ण आढळल्यास मुंबई महापालिकेला त्वरित कळवावे, असे स्पष्ट निर्देश दिल्याचे मुंबई महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.
ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फ्रान्स, स्वीडन, पोर्तुगाल, बेल्जियम, स्पेन, इटली, युके, युएसए आदी जवळपास १५ देशांमध्ये मंकी पॉक्सचा फैलाव वाढू लागला आहे. मंकी पॉक्सचा धोका लक्षात घेऊन मुंबई महापालिका सावध झाली असून सरकारी व खाजगी रुग्णालयांना ‘अलर्ट’ राहण्याचे निर्देश मुंबई महापालिकेने दिले आहेत. मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची स्क्रीनिंग करण्यात येणार असून संशयीत असल्यास चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करा,असे निर्देश देण्यात आले आहेत.
मंकी पॉक्स विषाणू
२१ दिवस राहतो शरीरात
मंकीपॉक्सचा विषाणू शरीरात ७ ते १४ दिवसांत दबा धरून राहतो. कधी कधी हा कालावधी २१ दिवसांपर्यंत राहू शकतो. या कालावधीत त्याच्यापासून दुसऱ्याला या विषाणूचा संसर्ग होत नाही. मात्र, हा कालावधी संपल्यानंतर एक ते दोन दिवसांच्या संपर्कामुळे याचा संसर्ग दुसऱ्याला होऊ शकतो.
मंकी पॉक्सची लक्षणे
सुरुवातीची लक्षणे फ्लू म्हणजे सर्दीसारखी असतात. यात ताप, डोकेदुखी, मांसपेशीच्या वेदना, कंबरदुखी, थरथरणे, थकवा आदींचा समावेश आहे. त्यानंतर चेहऱ्यावर पू भरलेले मुरुम दिसू लागतात. ते शरीराच्या इतर भागातही पसरतात व काही दिवसांनी कोरडे होऊन गळतात. त्यामुळे अनेक वैद्यकीय गुंतागुंत होण्याची शक्यता असते. या विषाणूमुळे मृत्यू दर १-१० टक्केपर्यंत वाढू शकतो.
मंकी पॉक्ससाठी राज्य सरकारच्या
खबरदारीच्या सूचना - राजेश टोपे
मंकी पॉक्ससंदर्भात केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार राज्याच्या आरोग्य विभागाला खबरदारी घेण्यास सांगण्यात आले असून अन्य सर्व विभागांना याबाबत कळविण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मागील २१ दिवसांत प्रभावित देशांमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व संशयितांवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. त्याचप्रमाणे संशयित रुग्णांची माहिती स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीने आरोग्य विभागाला देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संशयित रुग्णांची थुंकी आणि रक्ताचे नमुने एनआयव्ही, पुणे येथे तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत. अशा रुग्णांवर उपचार करताना सर्व संसर्ग नियंत्रण पद्धती पाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रुग्णाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास कॉण्टॅक्ट ट्रेसिंग सुरू केले जाईल, असे टोपे यांनी सांगितले.
बेल्जियममध्ये २१ दिवसांचे
सक्तीचे विलगीकरण
जगावर आता मंकी पॉक्सचे संकट आले असून अवघ्या २ आठवड्यांत रुग्णांची संख्या १०० च्या वर पोहोचली आहे. तथापि, या आजाराने आतापर्यंत एकही मृत्यू झालेला नाही. तरी सर्वत्र सावधगिरी बाळगली जात आहे. बेल्जियमने मंकी पॉक्सच्या रुग्णांसाठी २१ दिवसांचे सक्तीचे विलगीकरण सुरू केले असून असे करणारा तो जगातील पहिला देश ठरला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) कोणत्याही देशात या आजाराचा एक रुग्ण आढळला तरी तो या आजाराचा उद्रेक मानला जाईल, असे स्पष्ट केले आहे.
वानरात आढळला होता विषाणू
मंकी पॉक्स एक व्हायरल इन्फेक्शन आहे. हा संसर्ग १९५८ मध्ये सर्वप्रथम बंदिस्त वानरांत आढळला होता. १९७० मध्ये त्याचा मनुष्याला संसर्ग झाल्याची पुष्टी झाली. त्याचा व्हायरस कांजिण्याच्या (चिकनपॉक्स) व्हायरसच्या कुटुंबातील सदस्य आहे. हा एक विषाणूजन्य झुनोटिक रोग आहे. जो प्रामुख्याने मध्य आणि पश्चिम आफ्रिकेतील उष्णकटिबंधीय पर्जन्यवन भागात आढळून आला होता. कधीकधी इतर देशांमध्येही याचा प्रसार झाला होता.
प्राण्यांपासून संसर्ग
मंकी पॉक्स हा प्राण्यांपासून मानवांमध्ये तसेच मानवाकडून मानवांमध्ये प्रसारित होऊ शकतो. हा विषाणू तुटलेली त्वचा (जरी दिसत नसली तरीही), श्वसनमार्गातून किंवा श्लेष्मल पडद्याद्वारे (डोळे, कान किंवा तोंड) शरीरात प्रवेश करतो.
* चाव्याव्दारे किंवा ओरखडे, बुशमीट तयार करणे (बुशमीट हे वन्यजीव प्रजातींचे मांस आहे), शरीरातील द्रव किंवा घावाशी थेट संपर्क, किंवा दूषित बिछान्याद्वारे घावाशी अप्रत्यक्ष संपर्क यामुळे प्राण्यांपासून मनुष्यात मंकी पॉक्सचे संक्रमण होऊ शकते. मानव-ते-मानव संक्रमण प्रामुख्याने मोठ्या श्वासोच्छवासाच्या थेंबांद्वारे होते, असे मानले जाते.
* शरीरातील द्रव किंवा घाव सामग्रीच्या थेट संपर्काद्वारे आणि घाव सामग्रीच्या अप्रत्यक्ष संपर्काद्वारे देखील हा विषाणू प्रसारित होऊ शकतो, जसे की संक्रमित व्यक्तीचे दूषित कपडे किंवा लिनेनद्वारे.
* मंकी पॉक्सचे क्लिनिकल सादरीकरण स्मॉल पॉक्ससारखे आहे, एक संबंधित ऑर्थोपॉक्स व्हायरल संसर्ग ज्याला १९८० मध्ये जगभरातून निर्मूलन घोषित करण्यात आले होते. मंकी पॉक्स चेचकपेक्षा कमी सांसर्गिक आहे आणि कमी गंभीर आजार कारणीभूत आहे.