
मुंबई : यंदा वरुणराजाचे आगमन वेळेआधी होणार असे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. त्यामुळे मुंबईत पाणी तुंबण्याचा धोका लक्षात घेता पावसाचे पाणी उपसा करण्यासाठी ४१७ पंप बसवण्यात येणार आहेत. अभियंत्यांनी अनुभवाच्या आधारे पाणी साचण्याची ठिकाणे पूर मुक्त करावीत, असे निर्देश मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. तसेच गाळ उपसा व गाळ वाहून नेण्यात गैरप्रकार उघडकीस आल्यास संबंधित कंत्राटदार व अधिकारी जबाबदार असेल, असा इशारा अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिला आहे.
यंदा २७ मेपर्यंत केरळात मान्सूनचे आगमन होईल, असा अंदाज आहे. मुंबईतही यंदा वेळेतच पाऊस बरसणार असा अंदाज आहे. पावसाच्या आगमनाला काही दिवसच शिल्लक असून अद्याप नालेसफाईचे काम पूर्ण झालेले नाही. ३१ मे पर्यंत ७० टक्के गाळ उपसा करण्याचे टार्गेट आहे. परंतु आतापर्यंत ४६.३६ टक्के नाल्यातील गाळ उपसा करण्याचे काम पूर्ण झाले आहे. नालेसफाई, नाल्यातील गाळ उपसा करणे आदी कामांची झाडाझडती अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी रविवारी घेतली.
वाकोला नदी (कनाकिया पूल), एस.एन.डी.टी नाला (गझधरबंद उदंचन केंद्र), ओशिवरा नदी (मालाड), पिरामल नाला (गोरेगाव पश्चिम), रामचंद्र नाला (मालाड पश्चिम) आदी ठिकाणांचा समावेश आहे. तसेच नदी व नाल्यातून गाळ काढण्याच्या कामांची पाहणी करत संबंधितांना आवश्यक ते निर्देश दिले. प्रमुख अभियंता (पर्जन्य जल वाहिन्या) श्रीधर चौधरी यांच्यासह संबंधित अधिकारी दौऱ्याला उपस्थित होते.
वाकोला नदी प्रवाहाच्या खालील बाजूला मिठी नदीला जाऊन मिळते. वाकोला नदीला ११ ठिकाणी पूर प्रतिबंधक दरवाजे बसविण्यात आले आहेत. गतवर्षी पावसाळ्यात गोळीबार परिसरातील डिझेल जनरेटर पंप बंद पडला होता. त्यामुळे सखल भागात पाणी साचण्याची समस्या उद्भवली होती. त्यामुळे याठिकाणी उदंचन पंप बंद पडल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून डिझेल जनरेटर संच तातडीने उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे. त्या परिसरातील १२ उदंचन पंपांचा एक गट तयार करून पर्यायी व्यवस्था म्हणून वाहन आधारित एक डिझेल जनरेटर संच उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना त्यांनी केली. तसेच फिरते उदंचन पंप तयार ठेवावेत. तातडीच्या प्रसंगी या पर्यायी व्यवस्थेचा प्रतिसाद कालावधी कमी असला पाहिजे. जेणेकरून मोबाईल उदंचन पंप अथवा डिझेल जनरेटर संच तातडीने घटनास्थळी पोहचवता आले पाहिजेत, असे निर्देश अभिजीत बांगर यांनी दिले. आवश्यक त्याच ठिकाणी उदंचन पंप कार्यान्वित करावेत, विनाकारण खर्च नको, असेही बांगर यांनी नमूद केले. इर्ला व मोगरा नाले हे ओशिवरा नदीला येऊन मिळतात. भरतीच्या काळात मोगरा नाल्याच्या प्रवाहावर परिणाम होऊन पावसाळ्यात सखल भाग असलेल्या अंधेरी भूयारी मार्गात पाणी साचते. मात्र, पावसाळ्यातदेखील अंधेरी सब-वेतून होणारी वाहतूक सुरळीत पाहिजे, त्यासाठी अधिक दक्ष राहिले पाहिजे. याठिकाणी आवश्यक क्षमतेचे उदंचन पंप उपलब्ध असावेत, असे निर्देश बांगर यांनी दिले. पी दक्षिण विभागातील पिरामल नाल्यातील गाळ उपसा कामांची पाहणी करताना बांगर म्हणाले की, गोरेगाव पश्चिम येथील ओबेरॉय जंक्शन येथे पाणी साचण्याची समस्या उद्भवत आहे. पावसाळी पाणी वाहून नेण्यासाठी 'ओपन कट' पद्धतीने वाहिनी टाकणे शक्य नाही. हा महत्वाचा मार्ग असल्यामुळे याठिकाणी काम करणे आव्हानात्मक आहे. रस्ता न खोदता वाहतुकीस अडथळा न आणता 'बॉक्स पुशिंग' पद्धतीने ही वाहिनी टाकून पाण्याचा निचरा करावा, असे निर्देश बांगर यांनी दिले.
पाणी तुंबण्याचा ११ ठिकाणी धोका
एसएनडीटी नाला व गझधर बंद नाल्याच्या कडेला साचलेल्या घनकचरा, राडारोड्याची तातडीने विल्हेवाट लावावी. मागील वर्षी या परिसरात पाणी साचण्याची २४ ठिकाणे होती. मात्र आता पर्जन्यजल वाहिन्यांचे जाळे विस्तारल्याने पाणी साचण्याची १३ ठिकाणे कमी झाली आहेत. मात्र यंदाही पाणी साचण्याची ११ ठिकाणे शिल्लक राहिली असून पर्जन्य जल वाहिन्यांचे जाळे अधिक विस्तारत या ठिकाणी पाणी साचणार नाही, यादृष्टीने नियोजन करावे. वांद्रे रेल्वे वसाहत याठिकाणी असणारी कल्व्हर्ट स्वच्छ करून घ्यावी, यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनासमवेत समन्वय साधावा, अशा सूचना अभिजीत बांगर यांनी दिल्या.
हॉटेल ग्रँट हयात, पान बाई शाळा पाण्यात
वाकोला नदी प्रणालीत हॉटेल ग्रॅंट हयात येथे सखल भागात पावसाळी पाणी साचते. याठिकाणी रस्त्याच्या बाजुला 'बॉक्स ड्रेन' करण्यात येणार आहे. त्यासाठी वाहतूक पोलीस विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याच्या सूचना बांगर यांनी दिल्या. सांताक्रूझ पूर्व येथील पश्चिम द्रूतगती महामार्गावरील पान बाई आंतरराष्ट्रीय शाळेजवळ नेहमी पाणी साचते. या वर्षी याठिकाणी पुरेशा क्षमतेने उदंचन पंप उपलब्ध करून द्यावेत, तसेच पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी, असेदेखील निर्देश बांगर यांनी दिले.
दाट लोकवस्तीच्या ठिकाणी लोखंडी जाळ्याचे कुंपण
एसएनडीटी नाला व गझधर बंद नाल्याभोवती लोखंडी जाळी लावण्याचा फायदा झाला आहे. या जाळ्यांमुळे घरगुती कचरा नाल्यामध्ये येण्याचे प्रमाण ९० टक्क्यांनी खाली आले आहे. याच धर्तीवर दाट लोकवस्तीच्या ठिकाणी नाल्याभोवती दुतर्फा लोखंडी जाळ्या लावाव्यात.