पावसामुळे मुंबईकरांचा पाणीप्रश्न तात्पुरता मिटला; ७ तलावांत ९१ दिवसांचा पाणीसाठा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलाव क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून समाधाकारक पाऊस पडला. त्यामुळे तलावांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलाव क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून समाधाकारक पाऊस पडला. त्यामुळे तलावांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. बुधवारी ३३.०० मिमी ते २३५ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. गेल्या २४ तासांत तलाव क्षेत्रात ६४.०० मिमी ते १४३ मिमी इतका पाऊस पडला. त्यामुळे तलावांत ३,६४,२३३ दशलक्ष लिटर म्हणजे २५.१७ टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा ९१ दिवस म्हणजेच १८ सप्टेंबरपर्यंत पुरेल इतका आहे.

मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर आणि ठाणे, भिवंडी महापालिकेला दररोज १८० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा मुंबई महापालिकेकडून करण्यात येतो. मुंबई महापालिकेकडून गुरुवारी सकाळी ६ वाजेपर्यंत सात तलावात मिळून १,९०,७७१ दशलक्ष लिटर इतका म्हणजे ४७ दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक होता. मात्र गेल्या २४ तासांत पाणीसाठ्यात मोठी वाढ झाल्याने शुक्रवारी सकाळी ६ वाजेपर्यंत सात तलावातील हा पाणीसाठा आता ३,६४,२३३ दशलक्ष लिटर इतका झाला आहे. हा पाणीसाठा पुढील ९१ दिवस म्हणजे १८ सप्टेंबरपर्यंत पुरेल झाला आहे.

गेल्या आठवड्यात सात तलावातील पाणीसाठ्याची पातळी ९ टक्के होती. त्यामुळे पाणीकपातीची टांगती तलवार होती. मात्र गेल्या तीन-चार दिवसात तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्याने तलावातील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. मुंबईला पावसाळा संपल्यावर १ ऑक्टोबरपासून पुढील वर्षभरासाठी सात तलावांत मिळून एकूण १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठ्याची गरज असते. त्यामुळे मुंबईकरांना वर्षभर पाणीकपातीच्या संकटाला तोंड द्यावे लागत नाही. मात्र जर पाणीसाठा कमी असेल तर मुंबईकरांवर किमान ५ टक्के ते २० टक्के इतक्या पाणीकपातीच्या संकटाला तोंड द्यावे लागते.

logo
marathi.freepressjournal.in