

मुंबई : अनेक दिवसांच्या कोरड्या हवामानानंतर ऐन गणेशोत्सवात पावसाने बरसायला सुरुवात केली आहे. यामुळे गणेशोत्सवानिमित्त खरेदी करायला गेलेल्या भाविकांची त्रेधातिरपीट उडाली आहे.
रविवारी मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस झाला. भारतीय हवामान विभागाने काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे.
शनिवार रात्रीपासूनच मुंबईत पावसाचा जोर वाढला. शहराच्या अनेक भागांत सकाळपासून पाऊस सुरू असल्यामुळे काही सखल भागांत पाणी साचले.
मुंबईत जुलैनंतर पावसाचा जोर कमी झाला होता. ऑगस्टमध्ये तुरळक सरी पडल्या. आता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातही पाऊस रुसला होता. आता गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर पुन्हा पावसाची इनिंग सुरू झाली आहे.
अधिकृत आकडेवारीनुसार, रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत शहर विभागात सरासरी ५२.०७ मिमी पावसाची नोंद झाली, तर पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये अनुक्रमे ७२.७१ मिमी आणि ६५.९६ मिमी पाऊस पडला.
मेघगर्जनेसह वृष्टीचा अंदाज
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आकाश सामान्यतः ढगाळ राहील आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहतील आणि विजा चमकतील.
सोमवारी पहाटे १:३८ वाजता ४.४३ मीटर उंचीची दुसरी भरती येईल, आणि त्यानंतर सकाळी ७:१७ वाजता १.२१ मीटर उंचीची ओहोटी येईल.