भाजपच्या ४० टक्क्यांहून अधिक जागा धोक्यात?

सर्वेक्षणातील निष्कर्षांमुळे धाकधूक पुन्हा वाढली : आमदार-खासदार बदलण्याची मागणी
भाजपच्या ४० टक्क्यांहून अधिक जागा धोक्यात?

मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून राज्यात अनेक सर्व्हे केले जात आहेत. मात्र, अजित पवार गट सत्तेत सामील झाल्यानंतर भाजपने केलेल्या सर्व्हेत त्यांच्या राज्यातील ४० टक्के जागा धोक्यात असल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे. पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हवेत, पण उमेदवार बदला, असे धक्कादायक निष्कर्ष भाजपच्या सर्वेक्षणात समोर आल्याने आमदार-खासदारांची धाकधूक वाढली आहे.

अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर भाजप पक्षश्रेष्ठींनी काही राजकीय सर्वेक्षण करणाऱ्या कंपन्यांकडून राज्यात सर्व्हे केला होता. त्यात प्रत्येक मतदारसंघातील राजकीय परिस्थिती, आमदार-खासदारांचे कार्य, जनता व पदाधिकाऱ्यांशी वर्तन, समाजमाध्यमांवरील सहभाग, जनतेचे मोदी व आमदार-खासदारांविषयीचे मत आदी बाबींचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी आमदारांशी चर्चा करून त्यांच्या कामाचा आढावा घेतला. त्यात भाजपच्या प्रत्येक आमदार-खासदाराचे सर्वेक्षणानुसार रिपोर्ट कार्ड देण्यात आले व त्याविषयी कुठेही वाच्यता न करण्याची ताकीद देण्यात आली. लोकप्रतिनिधीच्या कामानुसार त्यांना श्रेणी देण्यात आल्या असून तो मतदारसंघ भाजपला किती सुरक्षित आहे किंवा धोक्यात आहे, याविषयी बारीकसारीक तपशील देण्यात आला आहे.

भाजपच्या विद्यमान खासदार आणि आमदारांपैकी सध्याच्या परिस्थितीत साधारणपणे ६० टक्के जागा भाजप जिंकू शकते आणि ४० टक्के जागा धोक्यात असल्याचा निष्कर्ष भाजपने केलेल्या सर्वेक्षणात नोंदविण्यात आले आहेत. भाजपने विधानसभेच्या तब्बल १७० जागा लढवण्याची तयारी केल्याचा दावाही सूत्रांनी केला आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना त्यांच्या विद्यमान आमदार- खासदारांव्यतिरिक्त भाजप फारशा जागा देणार नाही. अजित पवारांबरोबर किती आमदार आहेत, हा आकडा अजून गुलदस्त्यात असल्याने त्यांना त्यांच्याकडे असलेल्या आमदारांव्यतिरिक्त फारशा जागा मिळणार नाहीत. भाजप पक्षश्रेष्ठींनी हा अहवाल गंभीरपणे घेतला असून पुढील सर्वेक्षण डिसेंबरमध्ये होणार आहे.

मोदींना पसंती, लोकप्रतिनिधींना नापसंती

या सर्वेक्षणानुसार, जवळपास ५० ते ६० टक्के मतदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला पसंती दर्शवली आहे. पण त्यांनी स्थानिक उमेदवार बदलण्याचा आग्रह धरला आहे. संबंधित लोकप्रतिनिधींनी कोरोना काळात व त्यानंतर आरोग्याच्या आघाडीवर कोणतीही मदत केली नाही. याशिवाय इतर कामे करण्यातही त्यांनी रस दाखवला नाही, असे या सर्व्हेत नमूद करण्यात आले आहे.

मुंबईतील भाजपच्या दोन जागा धोक्यात

लोकसभेच्या मुंबईतील सहा जागांपैकी विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांचा उत्तर मुंबई आणि मनोज कोटक यांचा ईशान्य मुंबई मतदारसंघ भाजपकडेच राहील, असे सर्व्हेत म्हटले आहे. मात्र पूनम महाजन यांच्या उत्तर मध्य मुंबईत भाजपला विजयासाठी संघर्ष करावा लागेल. तसेच उत्तर पश्चिम मुंबईत सध्या शिवसेना शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तीकर आहेत. त्यांच्याविरोधात उद्धव ठाकरे गटाकडून त्यांचे पुत्र अमोल कीर्तीकर यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. ही जागा उद्धव ठाकरे गटाकडे जाण्याचे संकेत आहेत. दक्षिण मध्य मुंबईत शिंदे गटाच्या राहुल शेवाळे यांचा विजय कठीण मानला जात आहे. दक्षिण मुंबईत मात्र उद्धव ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांचेच प्राबल्य राहणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in