BMC मध्ये ५२ हजाराहून जास्त पदे रिक्त! दीड लाख कर्मचाऱ्यांची गरज, पण कार्यरत फक्त...

दीड कोटी मुंबईकरांना सोयीसुविधा उपलब्ध करून देणाऱ्या मुंबई महापालिकेत विविध विभागांतील तब्बल ५२ हजार २२१ पदे रिक्त असल्याचे माहिती अधिकारातून समोर...
BMC मध्ये ५२ हजाराहून जास्त पदे रिक्त! दीड लाख कर्मचाऱ्यांची गरज, पण कार्यरत फक्त...
Published on

मुंबई : दीड कोटी मुंबईकरांना सोयीसुविधा उपलब्ध करून देणाऱ्या मुंबई महापालिकेत विविध विभागांतील तब्बल ५२ हजार २२१ पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई महापालिकेचा कारभार हाकण्यासाठी १ लाख ४५ हजार कर्मचाऱ्यांची गरज असताना सद्यस्थितीत फक्त १ लाख कर्मचारी तणावपूर्ण वातावरणात आपली जबाबदारी पार पाडत आहेत. दरम्यान, २०२४-२५ मध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येणार असून रिक्त पदे तत्काळ भरण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून मुंबई महापालिकेची जगभरात ओळख आहे.‌ मुंबईची लोकसंख्या दीड कोटींच्या घरात पोहोचली असून पुढील २० वर्षांत १ कोटी ७५ लाख लोकसंख्या मुंबईची असेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे करदात्या मुंबईकरांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात कर्मचाऱ्यांअभावी पालिकेची दमछाक होणार आहे.

मुंबई शहर व उपनगरातील सुमारे सव्वा कोटी जनतेला नागरी सेवा पुरविण्याचे काम मुंबई महानगरपालिका अहोरात्र करीत असते. त्यासाठी १२९ विविध खाती विभाग कार्यान्वित करण्यात आले असून, त्यातील काही खाती किंवा विभाग अत्यावश्यक सेवेत मोडतात. नागरी सेवा पुरविण्यासाठी मुंबई महापालिकेने कर्मचाऱ्यांची १,४५,१११ इतकी शेड्युल्ड पदे निर्माण केली होती. मुंबई शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे नागरी सेवा पुरविण्यासाठी वेगवेगळी अतिरिक्त खाती व काही विभाग महापालिकेने सुरू केले आहेत. मात्र त्याठिकाणी लागणारे मनुष्यबळ नव्याने भरती केले नाही. इतकेच नाहीतर सेवानिवृत्ती, मयत आदी कारणांमुळे रिक्त होणारी कर्मचाऱ्यांची शेड्युल्ड पदे गेली अनेक वर्षे भरली गेली नाहीत. त्यामुळे सुमारे ५२ हजार २२१ पदे रिक्त असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे.‌

दीड कोटी मुंबईकरांना सोयीसुविधा उपलब्ध करून देणाऱ्या मुंबई महापालिकेतच हजारो पदे रिक्त ही पालिकेसाठी अभिमानाची गोष्ट नाही. कायमस्वरूपी कामगार भरती न करता कंत्राटी पद्धतीचा मार्ग पालिकेने अवलंबला आहे. कर्मचाऱ्यांअभावी उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत असून भविष्यात पालिकेत कंत्राटी राज्य असेल, असा आरोप म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in