रेल्वे रूळ ओलांडणारे गेले जीवानिशी; रूळ ओलांडताना सर्वाधिक अपघात: मध्य रेल्वेवर ३६३, तर पश्चिम रेल्वेवर २३३ जणांचा मृत्यू

जानेवारी ते जून या सहा महिन्यांत मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर विविध अपघातांमध्ये तब्बल १ हजार १८२ जणांचा मृत्यू झाला आहे.
रेल्वे रूळ ओलांडणारे गेले जीवानिशी; रूळ ओलांडताना सर्वाधिक अपघात: मध्य रेल्वेवर ३६३, तर पश्चिम रेल्वेवर २३३ जणांचा मृत्यू
प्रातिनिधिक फोटो
Published on

तेजस वाघमारे / मुंबई

लोकलमधून जनावरांसारखा लोकांचा प्रवास होत असल्याचे वाभाडे उच्च न्यायालयाने काढले होते. यातच आता आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. जानेवारी ते जून या सहा महिन्यांत मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर विविध अपघातांमध्ये तब्बल १ हजार १८२ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू रेल्वे रूळ ओलांडताना झाले आहेत. मध्य रेल्वेवर ३६३, तर पश्चिम रेल्वेवर २३३ जणांचा रूळ ओलांडताना मृत्यू झाल्याचे वास्तव लोहमार्ग पोलिसांच्या अहवालातून समोर आले आहे.

रेल्वे रूळ ओलांडू नका, असे आवाहन वारंवार मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येते. रेल्वे रूळ ओलांडताना अपघात होऊन रेल्वे सेवा विस्कळीत होते. त्यामुळे अशा घटनांना आळा घालण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने रूळ ओलांडणाऱ्या ठिकाणांवर बॅरिकेट‌्स लावण्यात आले आहेत. तसेच रूळ ओलांडणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येते. यानंतरही रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांना आळा घालण्यात प्रशासनांना यश आलेले नाही.

जानेवारी ते जून महिन्यात सर्वाधिक मृत्यू रेल्वे रूळ ओलांडताना झालेल्या अपघातामध्ये झाले. मध्य रेल्वे मार्गावर ३६३ आणि पश्चिम रेल्वे मार्गावर २३३ प्रवाशांचा मृत्यू रेल्वे रूळ ओलांडताना झाला. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर दररोज विविध कारणांनी सुमारे ६ ते ७ जणांचा मृत्यू होत आहे. यामध्ये रेल्वे रूळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांमध्ये दररोज सुमारे तीन प्रवाशांचा मृत्यू होत आहे, तर धावत्या लोकलमधून पडूनही प्रवाशांना जीव गमवावा लागत आहे.

जानेवारी ते जून २०२४ या कालावधीत मध्य रेल्वेवर विविध अपघातांमध्ये ७४२ आणि पश्चिम रेल्वेवर ४४० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुरुषांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून तब्बल १ हजार ६८ पुरुषांना जीव गमवावा लागला आहे. त्या तुलनेत महिला प्रवाशांचे प्रमाण कमी असून ११४ महिलांचा मृत्यू झाला आहे. गतवर्षी जानेवारी ते जून या कालावधीत दोन्ही मार्गांवर १ हजार २९९ प्रवाशांचा मृत्यू झाला. त्या तुलनेत यंदा मृत्यूमध्ये घट झाली आहे.

अपघातांमध्ये १ हजार ३७७ जखमी प्रवासी

मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर जानेवारी ते जून २०२४ या कालावधीत १ हजार ३७७ प्रवासी जखमी झाले. त्यामध्ये मध्य रेल्वेवर ८६६ आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील ५११ जखमी प्रवाशांचा समावेश आहे. यामध्येही १ हजार ७९ पुरुष आणि २९८ महिला प्रवाशांचा समावेश आहे.

लोकलमधून पडून जखमी झालेले

जानेवारी ते जून या कालावधीत मध्य आणि पश्चिम रेल्वेवर धावत्या लोकलमधून पडून ६९९ जण जखमी झाले. मध्य रेल्वेवर ४२३, तर पश्चिम रेल्वेच्या लोकलमधून पडून २७६ प्रवासी जखमी झाले. दोन्ही रेल्वेवर एकूण ५४९ पुरुष आणि १५० महिला जखमी झाल्या.

logo
marathi.freepressjournal.in