सीएसएमटी स्थानकातील बहुतांश 'डोअर मेटल डिटेक्टर' बंद

सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी थंडावली; बेजबाबदारपणामुळे एखादा घातपात झाला तर जबाबदार कोण?
सीएसएमटी स्थानकातील बहुतांश 'डोअर मेटल डिटेक्टर' बंद

दहशतवादी हल्ला झाला की खडाडून जागे होणारे रेल्वे प्रशासन आजही गाढ झोपेत आहे. जगासाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू असणाऱ्या आणि प्रतिदिन लाखो प्रवाशांची, पर्यटकांची वर्दळ असणाऱ्या सीएसएमटी रेल्वे स्थानकाची सुरक्षा आजही वाऱ्यावरच आहे. विविध उपकरणे, तंत्रज्ञानाचा भडीमार असणाऱ्या सीएसएमटी स्थानकात सुरक्षेच्या नावाने अक्षरशः खेळखंडोबा सुरु असल्याचे प्रतिदिन दिसून येत आहे. मुंबई हल्ल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून रेल्वे प्रशासनाकडून बसवण्यात आलेले स्थानकांवरील बहुतांश 'डोअर मेटल डिटेक्टर' आज बंदावस्थेत आहेत. तर या डिटेक्टरचा वापर न करता प्रवासी डिटेक्टरच्या बाजूने ये-जा करत आहेत. मात्र याबाबत रेल्वे पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची तपासणी, जनजागृती करण्यात येत नाही. परिणामी गर्दीच्या वेळेत सहज कोणीही स्फोटक पदार्थ घेऊन स्थानकात प्रवेश करू शकेल इतकी ढिसाळ सुरक्षा यंत्रणा सीएसएमटी स्थानकात कार्यरत आहे. यामुळे या बेजबाबदारपणामुळे उद्या एखादा घातपात झाला तर याला सर्वस्वी जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.

सीएसएमटी रेल्वे स्थानक म्हंटले की डोळ्यासमोर उभी राहते ती प्रवाशांची गर्दी. प्रतिदिन या स्थानकातून १० लाखांहून अधिक प्रवासी ये-जा करतात. तर लांब पल्ल्यांच्या मेल-एक्सप्रेस गाड्यांसाठी महत्त्वाचे असे टर्मिनल म्हणून सीएसएमटी स्थानकाकडे पाहिले जाते. मुंबईच्या सीएसएमटी रेल्वे स्थानकामध्ये २६/११च्या हल्ल्यानंतर तेथील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. तेव्हापासून रेल्वे स्थानकांवरील सुरक्षाव्यवस्था चोख ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. त्याचाच एक भाग म्हणून स्थानकाच्या प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या दिशेला 'डोअर मेटल डिटेक्टर' बसविण्याचा निर्णय झाला. सद्यस्थितीत पश्चिम रेल्वेपेक्षा जास्त डिटेक्टर मध्य रेल्वेवर आहेत. याची संख्या ८५ हून अधिक असून गर्दीचा आणि संवेदनशील अशा रेल्वे स्थानकात हे बसवण्यात आले आहेत. मात्र दुर्दैवाने या डोअर मेटल डिटेक्टरचा आवश्यक वापर केला जात नसून डिटेक्टर लावले म्हणजे आपली तपासणीची जबाबदारी संपली अशा मानसिकतेत सीएसएमटी स्थानकातील रेल्वे पोलीस वावरत आहेत. या डिटेक्टरमधून प्रवासी ये-जा करणे अपेक्षित आहे. जेणेकरून एखाद्या प्रवाशासोबत असणारी स्फोटक अथवा प्रवासासाठी घातक वस्तू असेल तर हे डिटेक्टर ते शोधून काढतील. मात्र घडतेय उलटेच. या डिटेक्टरमधन प्रवासी ये-जा न करता त्याच्या बाजूने आपला प्रवास करत आहेत. सकाळच्या गर्दीच्या सुमारास तर एकावेळी अनेक जण या डिटेक्टरमधून वावरत असल्याने त्याचा सेन्सर काम करत नसल्याचे चित्र पाहायला मिळते. दरम्यान, याबाबत रेल्वे स्थानकावर तैनात आरपीएफ, जीआरपी कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना डिटेक्टरमधून येण्याजाण्याची सूचना करणे आवश्यक आहे. तसेच हॅन्ड मेटल डिटेक्टरने तपासणी करणे देखील आवश्यक असताना प्रत्यक्षात तसे न होता हे कर्मचारी मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचे सर्रास दिसून येते. त्यामुळे कोणताही व्यक्ती सामान घेवून थेट रेल्वे स्थानकात प्रवेश करत आहे. रेल्वे सुरक्षिततेच्या त्रुटीचा फायदा घेवून कोणताही स्फोटक पदार्थ पार्सल करून असामाजिक तत्वांनी हल्ला चढविला तर याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने याची वेळीच दखल घेण्याची गरज आहे.

१६ डिटेक्टरपैकी ९ डिटेक्टर बंद; कंपनीकडून देखभाल-दुरुस्ती नाही

रेल्वे स्थानकावर सुरक्षेच्या दृष्टीने लावण्यात आलेल्या डोअर मेटल डिटेक्टरची देखभाल वेळच्या वेळी घेतली जात नाही. कोरोनापासून या मशिन्स वाऱ्यावर सोडण्यात आल्या आहेत. परिणामी अर्ध्याहून जास्त म्हणजेच ९ मेटल डिटेक्टर सद्यस्थितीत बंद असल्याचे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले. तसेच याबाबत मागील ६ महिन्यांपासून प्रत्येक १५ दिवसानंतर 'नाल्को' या मेटल डिटेक्टर बनवणाऱ्या कंपनीशी पत्रव्यवहार करत असून अद्याप याबाबत कोणतीही देखभाल दुरुस्ती करण्यात आले नसल्याचे वरिष्ठ रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

इंटिग्रेटेड सिक्युरिटी प्लॅनचे काय झाले?

रेल्वे स्थानकाची सुरक्षाव्यवस्था चोख करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून 'इंटिग्रेटेड सिक्युरिटी प्लॅन' तयार करण्यात येत आहे. या प्लॅन अंतर्गत 'व्हीआयपी मुव्हमेंट' किंवा चेंगराचेंगरी या सारख्या घटनांच्या वेळी पर्यायी मार्गांची रचना करणे, स्थानक परिसरातील 'सीसीटीव्ही', 'मेटल डिटेक्टर', बॅग स्कॅनरची संख्या वाढविणे, अनधिकृत मार्गाने होणारी घुसखोरी बंद करणे आदी गोष्टींना प्राधान्य दिले जाणार आहे. मात्र कोरोनानंतर हा प्लॅन कागदांवरच राहिला आहे. याशिवाय कोणत्याही प्रकारची भरती मागील काही वर्षात झाली नसल्याने मनुष्यबळही अपुरे पडत आहे. त्यामुळे महत्त्वाच्या अशा सीएसएमटी रेल्वे स्थानकाची सुरक्षा धोक्यात आली आहे. दरम्यान, रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आरपीएफ आणि जीआरपी यांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. प्रवासी सुरक्षिततेसाठी नियोजनबद्ध आराखडा आवश्यक असून त्याची काटेकोर अंमलबजावणी आज गरजेचे आहे.

सीएसएमटी रेल्वे स्थानकातील बहुतांश डोअर मेटल डिटेक्टर बंद असल्याचे खरं आहे. याबाबत आम्ही वारंवार आमच्या वरिष्ठांशी तसेच डिटेक्टर बनवणाऱ्या नाल्को कंपनीशी पत्रव्यवहार करत आहोत. मात्र अद्याप सकारात्मक प्रतिसाद आलेला नाही. मेटल डोअर डिटेक्टर सोडले तर स्थानकातील १९८ सीसीटीव्ही, बॅग्स तपासणी, श्वान पथक ठिकठिकाणी कार्यरत आहेत.

- टी. आर. मीना, उपनिरीक्षक, आरपीएफ, सीएसएमटी

बरेच मेटल डिटेक्टर बंद आहेत ही बाब खरी आहे. तात्काळ याबाबत तपासणी करून संबंधित विभागाशी संपर्क केला जाईल. लवकरच याठिकाणी सेवा पूर्ववत होईल.

- जीतेंद्र श्रीवास्तव, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे सुरक्षा दल

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in