
मुंबई : कौटुंबिक, सामाजिक विषयांचा निवाडा करणाऱ्या उच्च न्यायालयापुढे एक अनोखे प्रकरण सुनावणीला आले आहे. मृत अविवाहित तरुणाच्या आईने उच्च न्यायालयात धाव घेऊन मृत मुलाचे वीर्य प्रजनन केंद्राला देण्याबाबत निर्देश देण्याची विनंती केली आहे. त्यावर सुनावणीसाठी तयारी दर्शवून न्यायालयाने प्रकरण निकाली निघेपर्यंत मृत मुलाचे वीर्य जतन करण्याचे आदेश संबंधित क्लिनिकला दिले आहेत.
कर्करोगाचे निदान झाल्यानंतर अविवाहित तरुणाने मृत्यूपूर्वी त्याचे वीर्य जतन करून ठेवले होते. कर्करोगाशी झुंज देताना फेब्रुवारी महिन्यात त्याचा मृत्यू झाला. मुलाचे ते वीर्य आपल्या कुटुंबाचा वंश वाढवण्यासाठी प्रजनन केंद्राला देण्यात यावे, यासाठी न्यायालयाने वीर्य असलेल्या क्लिनिकला आदेश द्यावेत, अशी विनंती करीत मुलाच्या आईने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्ती मनिष पितळे यांच्या एकलपीठापुढे सुनावणी झाली.
याचिकाकर्त्या महिलेला फर्टिलिटी क्लिनिकने मुलाचे शुक्राणू देण्यास नकार दिला. वीर्य जतन करताना तरुणाने त्याच्या मृत्यूनंतर वीर्य व शुक्राणू नष्ट करण्याची इच्छा व्यक्त केली होती. या संदर्भात तरुणाने संमतीपत्रावर स्वाक्षरीही केली होती. कर्करोगाने ग्रस्त तरुणाने त्याच्या उपचार आणि केमोथेरपी सत्रादरम्यान वीर्य गोठवून ते जतन करण्याचा निर्णय घेतला होता. क्लिनिकचा दावा याचिकाकर्त्या महिलेने फेटाळला आहे.
महिलेचा युक्तिवाद
मुलाने कुटुंबाशी सल्लामसलत न करताच संमती अर्जावर सही केली आणि त्याच्या मृत्यूनंतर वीर्य नष्ट करण्यास सांगितले होते. आपल्याला मुलाचे वीर्य नमुने मुंबईतील क्लिनिकमधून गुजरातमधील आयव्हीएफ सेंटरमध्ये नेण्याची परवानगी देण्यात यावी, असा युक्तिवाद महिलेच्या वतीने करण्यात आला. त्याची दखल घेत न्यायालयाने याचिकेवरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत मृत तरुणाचे गोठवलेले वीर्य जतन करून ठेवण्याचे निर्देश क्लिनिकला दिले.