

मुंबई : गोरेगाव पश्चिमेकडील मोतीलालनगर १, २ व ३ या वसाहतींच्या पुनर्विकास प्रकल्पाचा समग्र विकास आराखडा (मास्टर प्लान) लवकरच सादर केला आहे. या पुनर्वसन प्रकल्पात रहिवाशांना तब्बल १६०० चौरस फूट क्षेत्रफळाची आधुनिक आणि स्वयंपूर्ण घरे देण्याची म्हाडाची योजना आहे. यासोबतच रहिवाशांना उच्च दर्जाच्या सार्वजनिक पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) बांधकाम व विकास संस्था या धोरणाने मोठ्या क्षेत्रफळांच्या आराखड्यांच्या पुनर्विकास धोरणात एक महत्त्वपूर्ण बदल घडवून आणला आहे. यामुळे म्हाडा मुंबईतील मोठ्या वसाहतींचा पुनर्विकास करून त्यांना आधुनिक मिश्र-वापर टाऊनशिप आणि उच्च दर्जाच्या सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये रूपांतरित करणार आहे. गोरेगाव पश्चिम येथील सुमारे १४३ एकर भूखंडावरील मोतीलालनगर वसाहतींचा पुनर्विकास हा याच धोरणाचे प्रमुख उदाहरण ठरला आहे.
गुणवत्ता, सुविधांना विशेष महत्त्व
म्हाडाची ओळख केवळ परवडणारी घरे उपलब्ध करून देणारी संस्था म्हणून राहिलेली नसून त्याचसोबत दर्जेदार घरे आणि उत्कृष्ट पायाभूत सुविधा निर्माण करणारी संस्था म्हणूनही विकसित होत आहे. मोतीलाल नगर पुनर्विकास हा या बदलाचा अग्रदूत आहे. येथे मोठ्या क्षेत्रफळाची घरे, विविध सोयीसुविधा आणि सुयोग्य नियोजन असलेली मिश्र-वापर टाऊनशिप यांची निर्मिती होत आहे, असे म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जैसवाल यांनी सांगितले. म्हाडाने पुढील काळात मुंबईत मोठ्या प्रमाणावर पुनर्विकास प्रकल्प राबवण्याचे उद्दिष्ट ठेवले असून या प्रकल्पांमध्ये गुणवत्ता आणि सुविधा यांना विशेष महत्त्व दिले जाणार असल्याचे जैसवाल यांनी स्पष्ट केले.
मोतीलालनगरसह मुंबईतील सहा मोठ्या वसाहतींचा पुनर्विकास
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या नायगाव बीडीडी चाळ येथील नवीन सदनिका वाटप कार्यक्रमात सांगितले की, मुंबईत सुमारे एक हजार एकर क्षेत्रावर पुनर्विकास व त्यातून गृहनिर्माण करण्याची सरकारची योजना आहे. गेल्या काही वर्षांत म्हाडाच्या धोरणांमध्ये मूलभूत बदल झाला आहे. सोसायट्यांच्या एकल पुनर्विकासापासून आम्ही आता एकात्मिक मोठ्या आराखड्यांच्या पुनर्विकासाकडे वळलो आहोत. मुंबई आणि उपनगरांमध्ये म्हाडाच्या ११४ वसाहती आहेत. त्यापैकी मोतीलालनगर, एसव्हीपीनगर, जीटीबीनगर, अभ्युदयनगर, कामाठीपुरा, आदर्शनगर आणि आरामनगर यांसारख्या मोठ्या वसाहतींचा पुनर्विकास करण्याची आमची योजना आहे, असेही जैसवाल यांनी सांगितले.
गोरेगावचा चेहरामोहरा बदलणार
मोतीलालनगर १, २ व ३ या वसाहतींचा पुनर्विकास करून एकात्मिक, मिश्र-वापर आणि मास्टर प्लाननुसार विकसित अत्याधुनिक टाऊनशिप उभारली जाणार आहे. भविष्यवेधी पायाभूत सुविधांसह हा प्रकल्प पश्चिम उपनगरांतील गोरेगाव परिसराचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलण्याच्या क्षमतेचा प्रकल्प ठरला आहे. यासह रुंद रस्ते, मोकळ्या जागा व मैदाने, क्रीडा सुविधा, पुरेसे पार्किंग, सामाजिक-सांस्कृतिक केंद्रे, व्यावसायिक संकुले आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा असलेली सर्वसमावेशक टाऊनशिप येथे विकसित केली जाणार आहे.
१. हा प्रकल्प केवळ पुनर्विकासापुरता मर्यादित राहणार नसून रहिवाशांच्या जीवनमानदेखील लक्षणीयरित्या उंचावणारा ठरणार आहे.
२. प्रकल्पाची मालकी आणि नियंत्रण हे म्हाडा स्वतःकडे ठेवणार असून नियुक्त केलेल्या खासगी कार्यकारी संस्थेच्या (सी&डीए) माध्यमातून दर्जेदार बांधकाम आणि प्रकल्पाची वेळेत पूर्तताही सुनिश्चित केली जाणार आहे.