दुचाकीचा आवाज करणाऱ्या कर्मचाऱ्याला ५०० रुपये दंड; राणी बागेतील प्राण्यांची दुचाकीच्या आवाजापासून सुटका

वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय येथील पेंग्विन गेट, मेन गेट, कॅमेल गेट, बैल गेट, बंगला गेट येथील तिन्ही पाळीतील सुरक्षा रक्षकांसह इतर कामगारांनी दुचाकी घेवून फिरल्यास त्त्यांना ५०० रूपये दंड भरावा लागणार आहे.
दुचाकीचा आवाज करणाऱ्या कर्मचाऱ्याला ५०० रुपये दंड; राणी बागेतील प्राण्यांची दुचाकीच्या आवाजापासून सुटका
Published on

मुंबई : वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय येथील पेंग्विन गेट, मेन गेट, कॅमेल गेट, बैल गेट, बंगला गेट येथील तिन्ही पाळीतील सुरक्षा रक्षकांसह इतर कामगारांनी दुचाकी घेवून फिरल्यास त्त्यांना ५०० रूपये दंड भरावा लागणार आहे. असे कार्यालयीन आदेश उपपशुवैद्यकीय अधिकारी यांनी काढले आहेत. यामुळे प्राणी संग्रहालयातील प्राण्यांना दुचाकीच्या कर्कश आवाजापासून सुटका होणार आहे.

भायखळा येथील महापालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय येथे अनेक वन्यजीव प्राणी वास्तव्यास आहेत. दरम्यान, बाग परिसर आवारात दुचाकी घेऊन येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा दुचाकीच्या आवाजाचा या प्राण्याना त्रास होत असल्याचे निदर्शनास आले. दुपारच्या विश्रांतीवेळी दुचाकीच्या आवाजामुळे सदर प्राण्याची झोपमोड होत होती, त्यामुळे प्राण्याच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर सदर आदेश काढण्यात आले आहेत.

असा आहे आदेश -

वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय येथील कार्यरत असलेले सुरक्षा रक्षक, मुकादम, प्राणिपाल, कामगार, ठेकेदारांचे कामगार पेंग्विन कर्मचारी, माळी, बाग देखभाल कर्मचारी, कॅफे वाईल्डमधील कर्मचारी, झू विला कॅफेमधील कर्मचारी, सर्व सफाई कर्मचारी व ठेकेदार या सर्वांना प्राणी संग्रहालयाच्या वेळेत सकाळी ९.३० ते ६ या वेळेत दुचाकी घेऊन उद्यान व प्राणी संग्रहालय परिसरात फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. असे कुणी आढळल्यास ५०० रुपये दंड आकारण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे सर्व गेट वरील सुरक्षा रक्षकांनी कोणतेही दुचाकी वाहन उद्यानात जाणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सदर आदेशाचे पालन न केल्यास गेट वरील सुरक्षा रक्षकास जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल, असा इशारासुध्दा देण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in