मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागात जे स्वच्छ्ता कंत्राटदार आहेत त्यांना आरोग्य विभागातील प्रशासन व सरकारच्या जाचक अटी शर्ती मान्य नसल्याने त्यांनी आता आंदोलनाची हाक दिली आहे.
सरकारी रुग्णालये व स्वच्छता हे समीकरण फार महत्वाचे आहे. जर स्वच्छताच नसेल, तर अगोदरच नाजूक असलेले रुग्णाचे आरोग्य अजून धोक्यात येऊ शकते. त्यामुळे स्वच्छ्ता कंत्राटदार हे महत्वाची भूमिका बजावत असतात; मात्र आता या स्वच्छता कंत्राटदारांचा हक्क सरकारने हिरावून घेत त्यांना बेरोजगार करण्याचा डाव रचला आहे. त्यांचे काम काढून बड्या भांडवलदारांना देण्याचे षडयंत्र सरकारने सुरू केले आहे, असा आरोप स्वच्छता कंत्राटदार संघटनेने पत्रकार परिषदेत दिला.
लाखो रुपयांचे कंत्राट घेणारे छोटे कंत्राटदार बाद करून करोडो रुपयांचे कंत्राट घेणारे बडे भांडवलदार सरकारला जवळचे वाटू लागले आहेत. असे चित्र नवीन निविदा प्रक्रिया मधील जाचक अटीशर्ती पाहून दिसत आहे. त्यामुळे या विरोधात संघटना आंदोलन व न्यायालयात जाणार असल्याची माहिती यावेळी संघटनेचे पदाधिकारी सचिन मुळीक यांनी यावेळी पत्रकार परिषदेत दिली.