महाराष्ट्र, छत्तीसगडमध्ये नक्षलवादी कारवाया वाढवण्याच्या हालचाली ;सीआरपीएफची अन्य सुरक्षा यंत्रणांना माहिती

केंद्रीय गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, माओवाद्यांकडून सध्या सुरू असलेल्या घटना धोक्याची घंटी वाजवणाऱ्या आहेत.
महाराष्ट्र, छत्तीसगडमध्ये नक्षलवादी कारवाया वाढवण्याच्या हालचाली ;सीआरपीएफची अन्य सुरक्षा यंत्रणांना माहिती

मुंबई : महाराष्ट्र, छत्तीसगडमध्ये नक्षलवादी कारवाया वाढण्याच्या हालचालींना जोर देण्यासाठी नक्षलवाद्यांनी प्रयत्न सुरू केला आहे, अशी गुप्त माहिती केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) अन्य सुरक्षा यंत्रणांना दिली आहे. तसेच नक्षलवादी चळवळीत लहान मुलांची भरती केली जात असल्याचे उघड झाले आहे.

महाराष्ट्र, छत्तीसगडमध्ये सुरू असलेल्या विकास प्रकल्पांमध्ये खो घालण्यासाठी नक्षलवाद्यांकडून सुरू आहेत. महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात छत्तीसगडला माओवाद्यांनी आपल्या कारवाया वाढवत आहेत. कुटुंबातील एका तरी मुलाला नक्षलवादी चळवळीत पाठवण्यासाठी माओवादी नेतृत्व आदिवासी कुटुंबांवर दबाव आणत आहे, असे सीआरपीएफने सांगितले.

सूरजगढ खाण प्रकल्पात अडचणी निर्माण करण्याचे प्रयत्न माओवाद्यांनी केले. सुरक्षा दल व आदिवासींमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न माओवादी करत आहेत. सूरजगढ परिसरात माडिया गोंड आदिवासी राहतात. त्यांच्या जमिनी कॉर्पोरेट कंपन्यांच्या ताब्यात देण्याचा सरकारचा कट असल्याचे आदिवासींना भडकवण्यात आले. त्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून या भागात अनेक आंदोलने करण्यात आली. सुरक्षा दलांनी २१ आदिवासींना अटक केली. ते सध्या चंद्रपूरच्या तुरुंगात आहेत, असे गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितले.

सध्या नवीन भरती करण्यात नक्षलवाद्यांना अडचणी येत आहेत. कारण अनेक नक्षलवादी कारवायांमध्ये मारले गेले तसेच अटकेत गेले. आता त्यांनी सूरजगढ व अन्य आदिवासी परिसरात भरती करण्यास सुरुवात केली आहे. सध्या मानवी हक्क कार्यकर्त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारतात आदिवासी सुरक्षित नसल्याचा विषय मांडायला सुरुवात केल्यानंतर परिस्थिती आव्हानात्मक बनली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

गुप्तचरांच्या अहवालानुसार, वकील लालसू नागोटी हे संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क चर्चेत सहभागी झाले होते. स्थानिकांची मागणी लक्षात घेता सूरजगड प्रकल्प थांबवावा, असे आवाहन त्यांनी केंद्र सरकारला केले. तसेच गडचिरोलीतील कोरची येथे लोखंडाचा प्रकल्प होणार आहे. त्यालाही स्थानिकांचा विरोध आहे.

गडचिरोलीतील विकासाला विरोध करण्यासाठी नक्षलवादी आदिवासींची दिशाभूल करत आहेत. तसेच १५ ते २५ वयोगटातील मुलांना भारत सरकारच्या विरोधात लढण्यासाठी नक्षलवादी दबाव आणत आहेत, असे गुप्तचर अहवालात म्हटले आहे.

केंद्रीय गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, माओवाद्यांकडून सध्या सुरू असलेल्या घटना धोक्याची घंटी वाजवणाऱ्या आहेत. कारण सुरक्षा दले लहान मुलांवर गोळीबार करणार नाही, असे नक्षलवाद्यांना माहिती आहे. तसेच लहान मुलांवर चकमकीत गोळीबार झाल्यास सुरक्षा दलांवर आरोप होऊ शकतात. तसेच मानवी हक्कांची पायमल्ली झाल्याची आरडाओरड होऊ शकते. बनावट चकमकीच्या नावाने टीका होऊ शकते. तसेच सुरक्षा दलांना गुप्त माहिती पुरवणाऱ्या संशयित स्थानिक गावकरी व आदिवासींना नक्षलवादी त्रास देत आहेत. २०२२ मध्ये माओवाद्यांनी सात नागरिकांना ठार केले. यंदाच्या नोव्हेंबरमध्ये गेल्या पाच दिवसांत तीन जणांना नक्षलवाद्यांनी ठार केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in